बीसीसीआयने आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अद्याप संघ जाहीर केला नाही. त्यामुळे स्पर्धीतील टीम इंडियाच्या समावेशाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पण भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा त्याची ‘ड्रीम टीम’ जाहीर केलीय. नियोजित वेळापत्रकानुसार टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये समावेश झाला, तर भारताचा पहिला सामना ४ जून रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सेहवागने त्याच्या ‘ड्रीम टीम’मध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांची संघाची सलामीजोडीसाठी निवड केलीय. वीरूने यावेळी शिखर धवनला संघातून डच्चू दिला. खरंतर २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवन स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. त्यामुळे धवनला वगळण्याच्या सेहवागच्या निर्णय आश्चर्यकारक ठरतो. संघात तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहलीला स्थान दिलं आहे. त्यानंतर युवराज सिंग, पुढे महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश सेहवागने केला आहे. ऋषभ पंत आणि केदार जाधव या युवा खेळाडूंनाही सेहवागने आपल्या संघात पसंती दिली. तर मनिष पांडेला वगळले आहे.

गोलंदाजांमध्ये सेहवागने मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांना पहिली पसंती दिली. याशिवाय, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा यांचाही समावेश केला आहे. फिरकीची धुरा सांभाळण्यासाठी सेहवागने आर.अश्विनची निवड केली.

असा आहे सेहवागने निवडलेला संघ-
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली (कर्णधार), युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), ऋषभ पंत, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, यझुवेंद्र चहल, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.