भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावरील त्याच्या खुमासदार शैलीतील ट्विटससाठी प्रसिद्ध आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतरही सेहवागने एक ट्विट केले. हे ट्विट रॉस टेलरला उद्देशून होते. त्यानंतर रॉस टेलरनेही सेहवागच्या या ट्विटला मजेशीर पद्धतीने उत्तर दिले. ट्विटरवरील दोघांच्या या शाब्दिक जुगलबंदीमुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले.

न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या रॉस टेलरचे अभिनंदन करताना सेहवागने त्याचा उल्लेख दर्जी(शिंपी) असा केला. “वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील (कपडे शिवण्याच्या) ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली”, असे मजेशीर ट्विट करत सेहवागने टेलरचे कौतुक केले. त्यावर रॉस टेलरनेही सेहवागला चक्क हिंदीत रिप्लाय दिला. “भाई, अगली बार अपना ऑर्डर टाईम पे भेज देना, तो मै आपको अगली दिवाली के पहले डिलिव्हर करुंगा.. हॅप्पी दिवाली”, असे ट्विट टेलरने केले. यानंतर सेहवागने पुन्हा एकदा रॉस टेलरची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.

..आणि कोहलीला त्याने शतकापूर्वीच झेलबाद केले!

“हाहाहा, मास्तरजी, इस साल वाली पतलून एक बिलांग छोटी करके देना नेक्स्ट दिवाली पे. रॉस द बॉस, मोस्ट स्पोर्टिंग”, असा डायलॉग सेहवागने मारला. तेव्हा तुमच्या टेलरने या दिवाळीत चांगले कपडे शिवले नाहीत का, असे ट्विट करून रॉसने सेहवागला प्रत्युत्तर दिले. अखेर सेहवागने रॉसच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत ही जुगलबंदी आवरती घेतली. कपडे शिवायचा प्रश्न असो की भागीदारी रचण्याचा, तुमच्या इतक्या उच्च दर्जाच्या शिवणकामाची स्पर्धा कोणीच करु शकत नाही, असे सेहवागने म्हटले.

रिकी पाँटींगवर विराट कोहलीची कुरघोडी, मुंबईच्या मैदानात कारकिर्दीतलं ३१ वे शतक

टॉम लॅथमचं संयमी शतक आणि त्याला रॉस टेलरने दिलेली भक्कम साथ या जोरावर पाहुण्या न्यूझीलंड संघाने पहिल्या वन-डे सामन्यात भारतावर ६ गडी राखून मात केली. या विजयासोबत न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या वन-डे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेलं २८१ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केलं.