X

… म्हणून यंदा ऑस्ट्रेलियाचा संघ स्लेजिंग करत नाही; सेहवागने रहस्य उलगडले

ऑस्ट्रेलियाचा संघ यंदा फारसा आक्रमक दिसला नाही

नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला ४-१ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ फारसा आक्रमक दिसला नाही. अनेकदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्यासाठी स्लेजिंग केले जाते. मात्र यंदा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अतिशय शांत होते. यामागील कारणाचा उलगडा भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील करार जाण्याची भीती असल्यानेच ऑस्ट्रेलियन संघ शांत होता, असे सेहवागने म्हटले आहे.

‘पुढील वर्षी आयपीएलसाठी लिलाव होणार आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ एकदिवसीय मालिकेत फारसा आक्रमक दिसला नाही. भारतीय खेळाडूंशी गैरवर्तन केल्यास आयपीएलमधील संघांचे मालक नाराज होतील आणि त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लिलावात मिळणारी धनलक्ष्मी हातून निसटेल, अशी भीती ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना वाटत असावी. कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ येऊ नये, म्हणूनच ते यंदा स्लेजिंग करत नसावेत,’ अशी बॅटिंग सेहवागने केली. आयपीएल सुरु झाल्यापासूनच या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मोठ्या प्रमाणात दिसले आहेत. कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर सातत्याने आयपीएलमध्ये खेळतात.

ऑस्ट्रेलियाच्या संघात आता फारसे दिग्गज खेळाडू नसल्याचेही सेहवागने म्हटले. ‘कधीकाळी ऑस्ट्रेलियाच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असायचा. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाकडे अनेक दादा खेळाडू होते. त्यांच्याकडे दबावाखाली उत्तम कामगिरी करण्याची क्षमता होती. मात्र आताच्या ऑस्ट्रेलियन संघात तसे फारसे खेळाडू नाहीत. त्यामुळेच त्यांचा संघ डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि आरॉन फिंच यांच्यासारख्या मोजक्या खेळाडूंवर अवलंबून आहे,’ असे निरीक्षण सेहवागने नोंदवले.

‘कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखालील संघात दिग्गज खेळाडूंचा अभाव आहे. स्टिव्ह वॉ, रिकी पॉन्टिंगच्या संघात शेन वॉर्न, ग्लेन मॅग्रा, मॅथ्यू हेडन, ब्रेट लीसारखे अनेक महान खेळाडू होते. त्यावेळचा ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या तांत्रिक सक्षमतेसोबतच मैदानावरील आक्रमकतेसाठीही ओळखला जायचा. मात्र स्मिथचा संघ मालिकेत ३-० असा मागे पडूनही तितका आक्रमक दिसला नाही,’ अशा शब्दांमध्ये सेहवागने ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीचे विश्लेषण केले. स्मिथच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाला घरच्या मैदानावर खेळताना दक्षिण ऑफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला. याशिवाय आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. याआधी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्यांना १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.

Outbrain