भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग हा आपल्या दिलखुलास बोलण्यासाठी ओळखला जातो. आपल्या फलंदाजीप्रमाणे त्याचे ट्विटसही धडाकेबाज असतात. दैनंदिन घडामोडींवर तो ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. नुकताच आयसीसीने सेहवागच्या मुलाखतीचा एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सेहवागने सचिन तेंडूलकर हा सर्वात वाईट डान्सर असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र त्याच वेळी सचिन सर्वोत्तम स्वयंपाकी म्हणजेच कूक असल्याचं सेहवागने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

विश्वचषक स्पर्धेदरम्यान समालोचन करणाऱ्या माजी खेळाडूंच्या मुलाखती ‘डिशींग द डर्ट’ या नावाखाली घेतल्या जात आहेत. माजी खेळाडूंच्या काळातील संघ सहकाऱ्यांसदर्भात या मुलाखतींमध्ये रॅपीड फायर प्रकारातील प्रश्न विचारण्यात येतात. अगदी तीन ते चार मिनिटांच्या मुलाखतीमध्ये क्रिकेटपटू मजेदार किस्से सांगताना दिसतात. याच कार्यक्रमात सेहवागनेही काही भन्नाट प्रश्नांना उत्तरे दिली. सेहवागला विचारलेले रॅपीड फायरमधील प्रश्न आणि त्याची उत्तरे खालीलप्रमाणे

१)
प्रश्न:
तुझ्या काळात सर्वाधिक सेल्फी कोण काढायचं?

सेहवागचे उत्तर:
आमच्या वेळी सेल्फीचा जमाना नव्हता. पण आत्ताचं विचारला तर मी विराट कोहलीचं नाव घेईल. तो खूप सेल्फी काढतो आणि त्याच्या सोशल नेटवर्किंग अकाऊण्टवर पोस्ट करत असतो. तसंच कॉमेन्ट्री बॉक्सचं विचारला तर मीच सर्वाधिक सेल्फी काढतो.

२)
प्रश्न:
सर्वात वाईट डान्सर?

सेहवागचे उत्तर:
सचिन तेंडुलकर

३)
प्रश्न:
तयार होण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणता खेळाडू लावतो?

सेहवागचे उत्तर:
हरभजन सिंग

४)
प्रश्न:
सर्वात चांगला स्वयंपाकी (कूक)?

सेहवागचे उत्तर:
सचिन तेंडुलकर. तुम्ही त्याला काहीही बनवायला सांगा तो बनवतो. ऑमलेट, अंडी, वरण-भात तुम्ही काहीही सांगा सचिन पाजी ते बनवतात.

५)
प्रश्न:
सर्वात चांगला गायक?

सेहवागचे उत्तर:
सुरेश रैना. तो खूप चांगलं गातं. मी मात्र बाथरुम सिंगर आहे.

६)
प्रश्न:
ड्रेसिंग रुममध्ये तू कोणाला सर्वाधिक घाबरायचा? आणि का?

सेहवागचे उत्तर:
अनिल कुंबळे. कारण अनिल कुंबळे मैदानावर सतत ओरडायचा. त्यामुळे तो ड्रेसिंग रुममध्ये आल्यावर सगळे शांत व्हायचे. कारण तुम्ही त्याला त्रास दिला तर तो तुम्हाला बांबूचे फटके देईल असं वाटायचं मला.

७)
प्रश्न:
सगळ्यात चांगले जोक कोण सांगायचं?

सेहवागचे उत्तर:
हरभजन सिंग आणि युवराज सिंग

८)
प्रश्न:
टूरवर असताना कोणाबरोबर तुला रुम शेअर करायला आवडायची नाही? आणि का?

सेहवागचे उत्तर:
एम. एस. धोनी. कारण तो रुम बाहेर पडल्यावर अनेक लोकं त्याच्या मागे लागतात. त्यामुळे त्याच्याबरोबर राहण्यात अर्थ नाही. माझ्या मागे कोणी लागत नाही कारण माझा वेळ निघून गेला आहे.

९)
प्रश्न:
कोणता खेळाडू स्वत:च नाव सर्वाधिक वेळा गुगल करत असावा?

सेहवागचे उत्तर:
सौरभ गांगुली. कारण त्याला सर्व विक्रम ठाऊक असतात. तो कदाचित रोज रेकॉर्डस गुगल सर्च करत असणार.

१०)
प्रश्न:
संगीतामध्ये सर्वात वाईट निवड कोणाची आहे?

सेहवागचे उत्तर:
युवराज सिंग. कारण तो ऐकतो त्या गाण्यांमध्ये संगीत नसतंच केवळ ‘ढिंग् चिक् ढिंग् चिक्’ आवाज असतो.

११)
प्रश्न:
सकाळी बेडवरुन उठल्या उठल्या चीड चीड करणारा खेळाडू

सेहवागचे उत्तर:
झहीर खान

१२)
प्रश्न:
टीमच्या बसमध्ये येण्यास नेहमी उशीर करणारा खेळाडू कोणता?

सेहवागचे उत्तर:
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण. तो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सेंकद मोजत उभा असायचा आणि बस निघायच्या वेळेस तो बसमध्ये चढायचा.

१३)
प्रश्न:
सतत जीममध्ये असणारा खेळाडू कोणता?

सेहवागचे उत्तर:
माझ्यावेळी राहूल द्रविड आणि आत्ता विचाराल तर कदाचित विराट कोहली कारण तो सोशल मिडियावर जीममध्ये अनेक व्हिडिओ पोस्ट करतो.

१४)
प्रश्न:
रोमॅन्टीक कॉमेडी सिनेमा आवडणारा खेळाडू कोण?

सेहवागचे उत्तर:
मला वाटतं मीच. कारण मी रोमॅन्टीक कॉमेडी प्रकारातले अनेक सिनेमे पाहतो. खास करुन गोविंदाचे सिनेमे मला खूप आवडतात.

दरम्यान यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सेहवाग समालोचक म्हणून कॉमेन्ट्री बॉक्समधून शाब्दिक फलंदाजी करताना दिसत आहे. त्याच्या शाब्दिक फलंदाजीची झलक या मुलाखतीमध्ये पण पहायला मिळाली.