भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर त्याच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखला जातो. सेहवाग नेहमी आपल्या ट्विटद्वारे लोकांना हसवण्याचे काम देखील करतो. या वेळी सेहवागने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या संथ फलंदाजीची खिल्ली उडवत एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी संथ फलंदाजी करणाऱ्या विल्यमसनने १७७ चेंडूत ४९ धावा केल्या. विल्यमसनचा स्ट्राईक रेट २७.६८ असा होता.

सेहवागने ट्वीट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने ”सोने दो सोने दो मुझ को नींद आ रही है”, या बॉलिवूड गाण्याचा उपयोग केला आहे. या व्हिडिओमध्ये एक पाळीव श्वान झोपलेला आहे. ‘आज खेळपट्टीवर विल्यमसन’, असे कॅप्शन सेहवागने या व्हिडिओला दिले आहे.

 

पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. उपाहारानंतर मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत. त्याने ४ बळी घेतले, तर दीडशेपेक्षा जास्त चेंडू खेळणाऱ्या केन विल्यमसनने ४९ धावा करत संघाला आघाडी मिळवून दिली होती.

हेही वाचा – WTC Final Day 6 Live : भारताचा कर्णधार माघारी, उपकर्णधार मैदानात

पहिल्या डावात २१७ धावा ठोकणार्‍या भारतीय संघाने पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसर्‍या डावात २ बाद ६४ धावा केल्या होत्या. संध्याकाळच्या सत्रात भारताला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्यात त्यांचे दोन्ही सलामीवीर गमावले. साऊदीने रोहित आणि शुबमनला माघारी धाडले.