वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटर हॅण्डलवर आपल्या हजरजबाबी आणि मनोरंजक ट्विट्ने सोशल विश्वात धुमाकूळच घातला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वाढदिवशी केलेले हटके ट्विट्स आणि टीकाकारांना दिलेले प्रत्युत्तर यामुळे वीरू सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. सेहवाग मैदानात ज्या स्वैरपणे फटकेबाजी करायचा, तोच मुक्तपणा त्याच्या ट्विटमध्येही दिसून येतो. यावेळी वीरूने भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची विनोद शैलीने ‘विकेट’ काढली आहे. गांगुलीची डोळे मिचकावत फलंदाजीची शैली आपणा सर्वांनाच परिचीत आहे. हाच धागा पकडून सेहवागने गांगुलीची तुलना पांडाशी केली आहे.

सेहवागने एका पांडाचा फोटो ट्विट केला असून एका चित्रात पांडाचे डोळे खूप मोठे, तर त्याच्याच बाजूला दुसऱया चित्रात पांडाचे डोळे खूप बारीक असल्याचा फोटो आहे. या फोटोवरून जर तुम्हाला कोणी आठवत असेल तर ओळखा पाहू, असे म्हणत सेहवागने पहिले ट्विट केले. पुढच्या ट्विटमध्ये छायाचित्रात दादा गांगुली आणि चायनिज पांडा असल्याचे त्याने सांगितले. डोळे मिचकावत प्रतिस्पर्धी फिरकी गोलंदाजांना स्टेडियमच्या बाहेर षटकार ठोकण्याची गांगुलीची फटकेबाजी कधीच विसरू शकत नाही, असे सेहवागने म्हटले आहे.

सेहवागचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून नेटिझन्स त्यावर खळखळून व्यक्त होताना दिसत आहेत. याआधी कोलकातामध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वीरू आणि गांगुली कॉमेंट्री बॉक्समध्ये एकत्र दिसले होते. तेव्हा सेहवाग, गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. वीरूने तेव्हाही गांगुलीसोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये धमाल उडवली होती. याशिवाय, बंगाल क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष असलेल्या गांगुलीने सेहवागच्या नावाने दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर स्टँड केला जावा, अशी मागणी देखील व्यक्त केली होती. इतकेच नाही, तर दिल्ली क्रिकेट बोर्डाने तसे न केल्यास, आपण ईडन गार्डन्सवर सेहवागच्या नावाचे स्टँड उभारू असे आश्वासन देखील दिले होते.