भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा आपल्या हटके ट्विटसाठी नेहमी चर्चेत असतो. एखाद्या विषयावर कल्पक पद्धतीने विचार मांडण्यात तो अग्रेसर असतो. असे असले तरी गंभीर विषयावरही तो आपले रोखठोक मत व्यक्त करतोच. काही दिवसांपूर्वी चीन-भारत रक्तरंजित संघर्षावर त्याने आपलं मत मांडलं होतं. त्यानंतर सेहवागने आज पुन्हा जवनांसंदर्भातील एक ट्विट केलं आहे. “लष्करी जवान आपला वाढदिवस साजरा करत आहे. चीज केक वगैरे सारं विसरा. बर्फाच्या केकची मजा आणि सौंदर्य पाहा. फक्त जवानांनाच हे सौंदर्य माहिती आहे.अशा जवानांच्या त्यागापुढे शब्दही अपुरे पडतात”, असे ट्विट करत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला.

पाहा तो व्हिडीओ-

दरम्यान, या आधी जवानांच्या संबंधी सेहवागने काही महत्त्वाचे ट्विट केले होते. चीनच्या मुजोरीनंतर प्रत्यक्ष ताबारेषेवर झालेल्या संघर्षात तेलंगणमधील कर्नल संतोष बाबू (३७) यांच्यासह २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. चीनच्या या मुजोरीचा सेहवागने चांगलाच समाचार घेतला होता. “कर्नल संतोष बाबू यांनी दिलेल्या बलिदानासाठी त्यांना सलाम. एकीकडे संपूर्ण जग करोनासारख्या अतिशय भयानक व्हायरसशी लढत असतानाच चीनकडून अशा प्रकारे वर्तणूक योग्य नाही. मला आशा वाटते की चीनने लवकर सुधरावं”, अशा शब्दात सेहवागने आपला राग व्यक्त केला होता.

याच संघर्षात भारतीय लष्करात शिपाई या पदावर कार्यरत असणारे कुंदन कुमार यांनीही आपल्या प्राणांचे बलिदान दिले. “१५-१६ जूनला चीनशी झालेल्या संघर्षात माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले याचा मला अभिमान आहे. मला दोन नातू आहेत, त्यांनादेखील मी सैन्यात भरती होण्यासाठी पाठवणार आहे”, असे कुंदन कुमार यांचे वडिल म्हणाले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेवर भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने त्यांना कडक सलाम ठोकला. “माणसाच्या रूपात देव कसा असतो ते पाहा”, असे ट्विट सेहवागने कुंदन कुमार यांच्या वडिलांना उद्देशून केले. तसेच, “चीनला आता लवकरच लढा शिकवला जाईल”, असेही सेहवागने नमूद केले होते.