डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून स्वप्नवत पदार्पण केले. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या या सामन्यात साकारियाने 4 षटकात 31 धावा देऊन 3 गडी बाद केले. केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि झाय रिचर्ड्सन या फलंदाजांना साकारियाने तंबूचा मार्ग दाखवला. या कामगिरीसोबत त्याने मैदानावर निकोलस पूरनचा भन्नाट झेलही टिपला. त्यामुळे चेतन साकारिया सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.

मागच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नेट बॉलर ते राजस्थानचा लीड बॉलर होण्यापर्यंतचा साकारियाचा प्रवास फार कठीण होता. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर साकारियाच्या संघर्षाची कहाणी शेअर केली. साकारियाच्या आईची मुलाखत शेअर करत सेहवाग म्हणाला, ”चेतन साकारियाच्या भावाने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यावेळी तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होता. 10 दिवस त्याच्या आईवडिलांनी हे वृत्त त्याच्यापासून लपवून ठेवले. क्रिकेट हे या युवा आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाचे आहे. आयपीएल खरोखरच भारतीयांचे स्वप्न पूर्ण करीत आहे आणि काही कथा या विलक्षण असल्याच्या समोर येतात.”

 

चेतनवर 1.2 कोटींची बोली

सौराष्ट्राकडून सय्यद मुश्ताक अली करंडक खेळत असताना जानेवारीत चेतन साकरियाच्या छोट्या भावाने आत्महत्या केली. तर, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आयपीएलच्या लिलावात साकारियाला राजस्थान रॉयल्सने 1.2 कोटी रुपये मोजून खरेदी केले. तो गेल्या वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचा (आरसीबी) नेट बॉलर होता. पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स क्रिकेटचा संचालक कुमार संगकारानेही साकारियाचे खूप कौतुक केले.

चेतनचे वडील होते ट्रक ड्रायव्हर 

चेतनचा राजस्थान रॉयल्स संघापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही खडतर आहे. चेतनचे वडील ट्रक ड्रायव्हर होते. त्यानंतर ते गुजरातमध्ये टेम्पो चालवू लागले. तेव्हा चेतनकडे खेळण्यासाठी आवश्यक वस्तूही नव्हत्या, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. भावसिंहजी क्रिकेट अकादमीने क्रिकेट शिकवण्याची फी सुद्धा घेतली नाही. त्यामुळे मी आता इथवर येऊन पोहोचलो, असेही तो सांगण्यास विसरला नाही.