विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. उपांत्य सामन्याआधी आलेल्या वृत्तानुसार, जर भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला असता आणि विश्वचषक जिंकला असता तर कदाचित धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र ना भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला, ना धोनीने निवृत्ती जाहीर केली. आता भारतीय संघ ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी १९ जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. दरम्यान याआधी बीसीसीआय जबरदस्ती धोनीला निवृत्ती घेण्यास भाग पाडू शकतं असं वृत्त आलं होतं. पण काही चाहत्यांनी धोनीने अद्यापही क्रिकेट खेळलं पाहिजे अशी आशा व्यक्त केली आहे.

एका वृत्तवाहिनीवर धोनीच्या निवृत्तीवरुन सुरु असलेल्या चर्चेदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग त्यावेळचे निवड समितीचे अध्यक्ष असणाऱ्या संदीप पाटील यांच्यावर चांगलाच भडकला. विरेंद्र सेहवागने आपलं उदाहरण देताना, आपल्या निवृत्तीवेळी कोणीही तुझा काय प्लान आहे अशी विचारणा केली नव्हती असं सांगितलं.

तो म्हणाला की, “महेंद्रसिंग धोनीने ही आपली शेवटची मालिका आहे हा निर्णय स्वत:च घ्यावा आणि ही मालिका खेळून निवृत्ती स्विकारावी. निवड समितीचं काम हे आहे की, त्यांनी धोनीला आता आम्हाला तू यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून तितका योग्य वाटत नाही हे सांगणं. तू तुझी काय योजना आहे सांग. माझी काय योजना आहे हे मलाही विचारलं असतं तर मी सांगितलं असतं. पण तसं झालं नाही”.

यावर संदीप पाटील यांनी आपण सहकारी विक्रम राठोड यांना सेहवागशी बोलण्यास सांगितलं होतं अशी माहिती दिली. यावर सेहवागने आपल्याला जेव्हा संघातून वगळण्यात आलं तेव्हा विक्रम राठोडने चर्चा केली असल्याचं उत्तर दिलं. एकदा वगळल्यानंतर अशा चर्चांना काही महत्व नसतं. जर धोनीला संघातून वगळल्यानंतर एमएसके प्रसाद यांनी तुझी काय योजना आहे ? असं विचारलं तर धोनी काय सांगणार.

धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेत सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि कपिल देव यासारख्या दिग्गजांनीही सहभाग घेतला आहे. धोनीने निवृत्ती घेऊन भविष्याच्या दिशेने वाटचाल करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने २००७ चा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला आहे. तसंच २०१३ मध्ये इंग्लंडचा तीन गडी राखत पराभव करत चॅम्पिअन्स ट्रॉफीही जिंकली होती.