संपूर्ण जग अजुनही करोना विषाणूच्या प्रादूर्भावाशी लढत आहे. आर्थिक महासत्ता अशी ओळख असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे.

दरम्यान जगभरातील नेते आणि अमेरिकन नागरिक ट्रम्प यांची तब्येत लवकर सुधारावी यासाठी सदीच्छा देत आहेत. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही आपल्या खास शैलीत ट्रम्प यांनी लवकरात लवकर करोनावर मात करावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रम्प को कोविड-१९ से निपटनेके लिये बाबा सेहवाग का आशिर्वाद, गो करोना गो करोना असं म्हणत सेहवागने आपला एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.

आणखी वाचा- मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर करोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण तात्काळ क्वारंटाइन प्रक्रिया सुरु केली असल्याचं सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे, “मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोविड पॉझिटिव्ह आढळले आहोत. आम्ही लवकरच क्वारंटाइन प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. आम्ही एकत्र यामधून बाहेर पडू”. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.