कोणत्याही ड्रायव्हर्सला कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक असते. पण नोएडातील बुद्ध इंटरनॅशनलच्या सर्किटवर खडतर वळणांवर सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करून विष्णू प्रसादने लागोपाठ दोन शर्यतींवर कब्जा केला. या कामगिरीसह त्याने जेके टायर अजिंक्यपद शर्यतीतील आव्हान कायम ठेवले आहे. चाहत्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार, बाइकच्या वेगाचा थरार यामुळे रविवारी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरील वातावरण भारावून गेले होते.
शनिवारी खराब सुरुवातीमुळे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानलेल्या विष्णू प्रसादने रविवारी सकाळी शानदार कामगिरी करत पोल पोझिशनवरून सुरुवात करणाऱ्या अखिल रवींद्रला सुरुवातीलाच मागे टाकून जेतेपदावर मोहोर उमटवली.
जेके रेसिंग इंडिया सीरिज, फॉम्र्युला एलजीबी-४, राष्ट्रीय कार्टिग चॅम्पियनशिप या तीन शर्यतींमध्ये सहभागी होणाऱ्या विष्णूला आता तिन्ही शर्यतींची जेतेपदे खुणावू लागली आहेत. ‘‘आता परदेशात जाऊन चांगली कामगिरी करण्यासाठी मला या तिन्ही शर्यती जिंकाव्या लागतील. राष्ट्रीय शर्यतींमध्ये मी माझ्या गुणवत्तेचा ठसा उमटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे,’’ असे विष्णूने जेतेपदानंतर सांगितले.
मोटारबाइकच्या थराराने चाहते मंत्रमुग्ध
जेके टायर अजिंक्यपद शर्यतीत या वेळी प्रथमच मोटारबाइक शर्यत आयोजित करण्यात आली होती. १००० सीसी क्षमतेच्या बाइकचा थरार पाहून सर्किटवर उपस्थित असलेले चाहते मंत्रमुग्ध झाले. दिल्लीच्या कुलवंत सिंग माँटीने १६ मिनिटे ५५.५८३ सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपदावर नाव कोरले. गुरविंदर सिंगने दुसरा तर भुपिंदर सिंगने तिसरा क्रमांक पटकावला.
दिलजितला एलजीबी-४चे जेतेपद
मोटारस्पोर्ट्समधील पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या एलजीबी-४ या गटात दिलजित सिंगने जेके टायर अजिंक्यपद शर्यतीतील चारपैकी तीन शर्यती जिंकून अजिंक्यपदाच्या दिशेने कूच केली आहे. आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या अंतिम टप्प्यात दिलजित आणि विष्णू प्रसाद यांच्यात अजिंक्यपदासाठी कडवी चुरस रंगणार आहे. दिलजितने २० मिनिटे ०२.२४५ सेकंद अशी वेळ नोंदवून ही शर्यत जिंकली. ०.३२९ सेकंदाने मागे पडलेल्या विष्णूला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राघुल रंगास्वामीने २०.०२.९१२ सेकंद अशा कामगिरीसह तिसरे स्थान पटकावले.