कलात्मक जिम्नॅस्टिकमधील प्राडुनोव्हा प्रकार निश्चितच धोकादायक आहे. मात्र यश मिळवण्यासाठी धोका पत्करावा लागतो. दीपा कर्मकारला प्राडुनोव्हा प्रकारात सहभागी होण्याचा सल्ला मीच दिला. दीपाची सरावाची पद्धत, सर्वोत्तमाचा ध्यास आणि धाडसी स्वभाव हे मुद्दे लक्षात घेऊन विचारपूर्वकच निर्णय घेतला होता. दीपाने माझ्या निर्णयाला साथ देत इतिहास घडवला. निर्णय माझा असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिच्या वाटचालीचे श्रेय तिच्या मेहतनीला आहे अशा शब्दांत दीपाचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लहानपणापासून दीपाला जिम्नॅस्टिक्सचे धडे देणाऱ्या नंदी यांच्या मार्गदर्शनाखालीच दीपाने ऑलिम्पिकवारी पक्की केली. जिम्नॅस्टिक्स खेळ, दीपाची कारकीर्द, संघटनेचा पाठिंबा, खेळाचे भविष्य याबाबत नंदी यांच्याशी केलेली बातचीत.

* दीपाच्या जिम्नॅस्टिक्स वाटचालीची सुरुवात कशी झाली?

अगरतळा येथील जिम्नॅस्टिक्स केंद्रात तिने खेळायला सुरुवात केली. २००१ मध्ये सहा वर्षांची दीपा माझ्या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाली. खेळ आणि सरावाबाबत ती तेव्हाही अतिशय गंभीर असायची. मात्र एका शारीरिक दोषामुळे तिच्या जिम्नॅस्टिक कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हा खेळ शारीरिक कसरतींचा आहे. विवक्षित उंचीवरून जमिनीवर झेप घेणे महत्त्वाचे असते. दीपाच्या पायाचा तळवा सपाट होता. यामुळे जमिनीवर झेप घेताना तिला अडचण जाणवत असे. आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तिच्या पायाला वक्राकार स्थिती मिळावी यासाठी आम्ही विशिष्ट व्यायाम प्रकार तयार केला. दीपाने या व्यायामासाठी प्रचंड मेहनत घेतली. यामुळे तिच्या सपाट तळव्याची अडचण मिटली आणि वाटचाल सुकर झाली.

* लहान वयात दीपाने जिम्नॅस्टिक्समध्ये घेतलेली झेप विलक्षण अशी आहे. तिच्या प्रवासाचे वर्णन कसे कराल?

लहानपणापासून दीपा अतिशय जिद्दी आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की तिचे भान हरपते. एखाद्या कौशल्यात घोटीवपणा येईपर्यंत ती अथक सराव करत राहते. तिच्या वयाच्या मुलामुलींच्या तुलनेत ती अतिशय शिस्तबद्ध आहे. खेळाप्रतीची तिची निष्ठा हेच यशस्वी वाटचालीचे गमक आहे. माझ्याकडे प्रशिक्षणाला सुरुवात केल्यापासून अवघ्या वर्षभरात राष्ट्रीय पातळीवर सबज्युनियर गटात सुवर्णपदक पटकावले. थोडय़ाच दिवसात राष्ट्रीय स्पर्धेत, कनिष्ठ गटात तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली. जिंकणे ही तिची सवय झाली. सराव, स्पर्धा, पदके या गोष्टी तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटत झाल्या. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. त्याच वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही ती सहभागी झाली नाही. दोन्ही स्पर्धामध्ये तिला पदकाने हुलकावणी दिली. मात्र पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावेन असा पण तिने केला. २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने कांस्यपदकावर नाव कोरले. पुढच्या वर्षी २०१५ मध्ये हिरोशिमा, जपान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेद्वारे रिओवारी पक्की करण्याचा तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पण खचून न जाता जिद्दीने खेळ करत रिओसाठी पात्र ठरली.

* प्राडुनोव्हा हा कठीण प्रकार अंगीकारण्याचा निर्णय कोणाचा होता?

तो निर्णय माझा होता. दीपा हा प्रकार यशस्वीपणे करू शकते हा विश्वास होता. तिने हा विश्वास सार्थ ठरवला. या निर्णयासाठी माझ्यावर टीका झाली. पण यशासाठी धोका पत्करावा लागतो. घोटीव सातत्य असेल तर सर्वोत्तम प्रदर्शन होते. जेणेकरून दुखापतींची शक्यता कमी होते. प्राडुनोव्हाचा सराव करता येईल अशी सुविधा फक्त दिल्लीच्या इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरवलेल्या सोयीसुविधांमुळेच दीपाची वाटचाल सोपी झाली आहे.

* खेळाच्या प्रसारात संघटनेची भूमिका महत्त्वाची असते. मात्र जिम्नॅस्टिक्स संघटनांमध्ये दुफळी आहे?

राजकारणात मला जराही रस नाही. किती संघटना आहेत, कोण पदाधिकारी आहेत याची कल्पनाही मी दीपाला येऊ देत नाही. खेळणे हे तिचे काम आहे. परंतु संघटनात्मक पाठिंबा नसल्याने अडचणी वाढतात. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दोन वर्ष झालेली नाही. निधीसाठी सरकारवर अवलंबून राहावे लागते. देशभरात २२ राज्यांमध्ये जिम्नॅस्टिक्स खेळले जाते. मात्र केवळ ७-८ राज्यांमध्येच चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. खेळ खर्चीक असल्याने मर्यादा येतात.

* दीपाच्या यशाने देशातल्या जिम्नॅस्टिक्सच्या प्रचाराला गती मिळेल?

निश्चितच. आतापर्यंत प्रसारमाध्यमांनी जिम्नॅस्टिक्सकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु दीपाच्या यशाने चित्र बदलले आहे. सर्वागसुंदर अशा या खेळाची मूलभूत क्रीडाप्रकारांमध्ये गणना होते. दीपाच्या वाटचालीमुळे खेळाडू तसेच पालकांमध्ये खेळाविषयीची जागरूकता वाढू लागली आहे. बहुतांशी ठिकाणी खेळाची अवस्था भीषण आहे. चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळू लागल्यास दीपाच्या यशाला नवा अर्थ प्राप्त होईल.