माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पध्रेच्या सातव्या फेरीत अर्मेनियाच्या लेव्हॉन अ‍ॅरोनिअनला बरोबरीत रोखून आपले संयुक्त दुसरे स्थान कायम राखले आहे. या बरोबरीमुळे आनंदच्या खात्यात ४.५ गुण जमा झाले आहेत. आनंदच्या लढतीसह बुधवारी झालेल्या इतर सामन्यांतही बरोबरीचा निकाल पाहायला मिळाला.
व्हॅसेलिन टोपालोव्हने सहा गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे, तर आनंद आणि नाकामुरा हे प्रत्येकी ४.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. या स्पध्रेत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची अखेरची संधी आनंदला नॉर्वेच्याच जॉन लुडव्हिग हॅमर याच्याविरूद्ध आहे. त्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी आनंदला हॅमर याच्याविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. चार गुणांसह चौथ्या स्थानावर असलेला हॉलंडचा अनिष गिरी हाही अव्वल तिघांमध्ये स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे. इटलीचा फॅबिआनो कारुआना, फ्रान्सचा व्हॅचिएर लाग्रेव्ह आणि अ‍ॅरोनिआ प्रत्येकी तीन गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत.
काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या आनंदने सुरुवातीपासून सामन्यावर पकड निर्माण केली होती. इंग्लिश ओपनिंगने सुरुवात करणाऱ्या अ‍ॅरोनिआनला सडेतोड उत्तर देत आनंदने वर्चस्व राखले. काही प्याद्यांच्या बळी नंतरही अ‍ॅरोनिआने दोन्ही उंट जिवंत राखत आनंदसमोर कडवे आव्हान उभे केले होते. अखेरीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरीवर समाधान मानणे पसंत केले. दिवसातील पहिल्या लढतीत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याने व्हॅचिएर लाग्रेव्ह याच्याविरुद्ध बरोबरीवर समाधान मानले.