भारताच्या विश्वनाथन आनंद याने नॉर्वे चषक बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्याने सहाव्या फेरीत फ्रान्सचा ग्रँडमास्टर मॅक्झिम व्हॅचिअर लाग्रेव्ह याच्यावर शानदार विजय मिळविला.
बल्गेरियाच्या व्हॅसेलीन तोपालोव्ह याने साडेपाच गुणांसह आघाडीस्थान राखले आहे. त्याने रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक (२) याचा पराभव केला. आनंद व अमेरिकाचा हिकारू नाकामुरा यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. नाकामुरा याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याला बरोबरीत रोखून अनपेक्षित धक्का दिला. नेदरलँड्सच्या अनिष गिरी याने साडेतीन गुणांसह तिसरे स्थान घेतले आहे. फॅबिआनो कारुआना (इटली) व लाग्रेव्ह यांचे प्रत्येकी अडीच गुण झाले आहेत. कारुआना याला स्थानिक खेळाडू जॉन लुडविग हॅमर याने बरोबरीत रोखले.
प्रत्येक फेरीअखेर आनंदच्या खेळात खूप लक्षणीय प्रगती दिसून येत आहे. त्याने सिसिलीयन नॉर्जडॉर्फ तंत्राच्या डावात सुरेख डावपेच केले. डावाच्या मध्यास त्याने खेळावर नियंत्रण मिळविले. त्याने केलेल्या डावपेचांपुढे लाग्रेव्ह याचा बचाव निष्फळ ठरला.
डाव संपल्यानंतर आनंद म्हणाला, सुरुवातीला मी डाव बरोबरीत ठेवण्याच्या दृष्टीने खेळत होतो. मात्र हळूहळू डावावर नियंत्रण मिळाल्यानंतर मी डाव जिंकण्यासाठीच खेळत राहिलो. सुदैवाने त्याचा बचाव अपेक्षेइतका प्रभावी नव्हता. त्याचा फायदा मला मिळाला.
लाग्रेव्ह म्हणाला, या डावात मी मिळालेल्या संधींचा लाभ घेऊ शकलो नाही. अन्यथा डाव बरोबरीत सोडविला असता. उंटाचा बळी देत डावावर नियंत्रण मिळविण्याची संधी मी साध्य करू शकलो नाही. त्या वेळी आनंदच्या बलाढय़ अनुभवाचे माझ्यावर दडपण आले होते.