सलग दोन पराभव स्वीकारणाऱ्या माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला ग्रेनकेन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजयाची बोहनी लाभली. आनंदने जर्मनीच्या डेव्हिड बारामिझवर शानदार विजय मिळविला. आनंदला या स्पर्धेत नॉर्वेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. पाठोपाठ अर्मेनियाच्या लिवॉन अरोनियनने आनंदला पराभवाचा धक्का दिला होता. आनंदने बारामिझविरुद्ध सुरेख डावपेच करीत विजय मिळविला. यंदाचा त्याचा हा पहिलाच विजय आहे. आनंदचे आता अडीच गुण झाले आहेत. कार्लसन व अर्कादिज नैदितिश यांनी प्रत्येकी चार गुणांसह संयुक्त आघाडीस्थान घेतले आहे. कार्लसनने इटलीच्या फॅबिआनो कारुआनाविरुद्ध बरोबरी स्वीकारली. कारुआना याचे साडेतीन गुण झाले आहेत.