भारताच्या विश्वनाथन आनंदने बिलबाओ बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली. त्याला हे जेतेपद मिळविण्यासाठी केवळ अध्र्या गुणाची आवश्यकता आहे. आनंदने पाचव्या फेरीत युक्रेनच्या रुझलान पोनोमोरिओव्ह याला ५९ व्या चालीस बरोबरीत रोखले व आपली गुणसंख्या अकरा केली आहे.
आनंदने चौथ्या फेरीत स्पेनच्या फ्रान्सिस्को व्हॅलेजो पोन्स याच्यावर दणदणीत विजय मिळविला होता. अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनने आठ गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. त्याने पाचव्या फेरीत पोन्सला बरोबरीत रोखले. पोनोमोरिओव्ह व पोन्स हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत.
शेवटच्या फेरीत आनंदला अरोनियनविरुद्ध खेळावे लागणार आहे. या डावात अरोनियनला पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा लाभ मिळणार आहे. त्याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली तरीही आनंद याला विजेतेपद मिळू शकेल. आनंदचे लक्ष विश्वविजेतेपदाच्या लढतीकडे लागले आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या लढतीत आनंदला नॉर्वेच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनशी दोन हात करावे लागतील. त्यामुळे हे विजेतेपद आनंदसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.