गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्वविजेतेपदाचा मुकुट गमवावा लागल्यानंतर जगज्जेता विश्वनाथन आनंद व्यथित झाला होता. पण या धक्क्यातून सावरल्यानंतर आता १३ ते ३० मार्चदरम्यान होणाऱ्या आव्हानवीराच्या शर्यतीत खेळणार असल्याचे आनंदने स्पष्ट केले आहे. दुहेरी राऊंड-रॉबिन पद्धतीने होणाऱ्या १४ फेऱ्यांच्या या स्पर्धेतील विजेता नॉर्वेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला विश्वविजेतेपदासाठी आव्हान देणार आहे. आनंदसह रशियाचे व्लादिमिर क्रॅमनिक आणि दिमित्री आंद्रेईकीन, बल्गेरियाचा व्हेसेलिन टोपालोव, अझरबैजानचा शाख्रीयार मामेद्यारोव्ह, अर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन, रशियाचा सर्जी कार्याकिन आणि पीटर स्विडलर हे अव्वल बुद्धिबळपटू एकमेकांशी झुंजणार आहेत. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) ठेवलेल्या २० जानेवारी या अंतिम मुदतीआधी आठही खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. चेन्नईत एकतर्फी रंगलेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत दहा फेऱ्यांतच पराभूत व्हावे लागल्यामुळे आनंदने भवितव्याविषयी रणनीती ठरवण्याकरिता विश्रांती घेतली होती. आव्हानवीराच्या स्पर्धेत क्रॅमनिक आणि अरोनियन यांचे पारडे जड आहे. आनंदचा ढासळता फॉर्म यामुळे त्याला विजेतेपदासाठी दावेदार समजले जात नाही. मात्र २९ जानेवारीपासून झ्युरिक येथे होणाऱ्या सहा अव्वल बुद्धिबळपटूंच्या स्पर्धेत आनंद आणि कार्लसन पुन्हा एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.