भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत शाख्रीयर मामेद्यारोव्ह (अझरबैजान) याच्यावर केवळ ३१ चालींमध्ये मात करीत सफाईदार विजय नोंदविला.
आनंदने तिसऱ्या फेरीअखेर अडीच गुणांची कमाई केली आहे. गतवर्षी मॅग्नस कार्लसनविरुद्ध विश्वविजेतेपदाची लढत गमावल्यानंतर येथे आनंदने आतापर्यंत अव्वल दर्जाचे कौशल्य दाखविले आहे.
अन्य लढतीत माजी विश्वविजेत्या व्हॅसेलीन तोपालोव्ह या बल्गेरियाच्या खेळाडूस अर्मेनियाच्या लिवॉन आरोनियन याच्याविरुद्ध विजयाची संधी साधता आली नाही. हा डाव बरोबरीत सुटला. दिमित्री या रशियाच्या खेळाडूने आपलाच सहकारी सर्जी कर्जाकिन याला बरोबरीत रोखले. तोपालोव्ह व आरोनियन यांचा प्रत्येकी दीड गुण झाला आहे.
आनंद याने मामेद्यारोव्हविरुद्धच्या डावात प्रतिस्पर्धी खेळाडूच्या कमकुवत चालींचा फायदा घेतला. २६ व्या चालीस मामेद्यारोव्ह याने केलेली घोडचूक आनंदच्या पथ्यावर पडली व तेथून आनंदने डावावर नियंत्रण घेत ३१ व्या चालीस डाव जिंकला.