25 October 2020

News Flash

निवृत्तीचा अद्याप विचार केलेला नाही – आनंद

‘‘बुद्धिबळ या खेळाने मला बरेच काही दिले आहे.

भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद

‘‘बुद्धिबळ या खेळाने मला बरेच काही दिले आहे. इतकी वष्रे या खेळाशी जोडलेले घट्ट नाते, इतक्या सहजासहजी तोडणे मला शक्य नाही. त्यामुळे निवृत्तीबाबत विचारत असाल, तर मी अद्याप त्याचा विचार केलेला नाही,’’ असे मत पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने व्यक्त केले. ‘लिवा’ या फॅब्रिक कंपनीने मुंबईत आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात आनंदने निवृत्तीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
दहा वर्षांत पहिल्यांदा विश्वविजेतेपदाच्या शर्यतीतून आनंदला मुकावे लागले. त्याच्या या अपयशानंतर बुद्धिबळ क्षेत्रात त्याच्या निवृत्तीच्या चर्चाना उधाण आले, परंतु तसा विचारही अजून मनात आला नसल्याचे त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘‘यश-अपयश हा आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता पुन्हा नवी उभारी घेण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. जोपर्यंत ही उभारी घेण्याचे धाडस माझ्यात आहे, तोपर्यंत निवृत्ती नाहीच. ज्या वेळी वाटेल की आपला खेळ साजेसा होत नाही, त्या वेळी नक्की विचार करेन.’’
आनंदच्या ‘चेस ईन स्कूल’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने भारतभरातील १७ हजार शाळांनी सहभाग घेतला आहे. त्याच्या यशाबद्दल आनंद भरभरून बोलला. तो म्हणाला, ‘‘मुलांनी बुद्धिबळ खेळाकडे वळावे किंवा त्यांनी यात कारकीर्द घडवावी असा आमचा हेतू नाही. बुद्धिबळातून त्यांची मानसिक घडण होते. त्यामुळे अधिकाअधिक शाळांनी यात सहभाग घ्यावा यासाठी आमचा प्रयत्न आहे.’’

रिओमध्ये जास्तीत जास्त पदकांची अपेक्षा
रिओ ऑलिम्पिक स्पध्रेला अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि भारतीय खेळाडूंची तयारी पाहता, यंदा अधिकाधिक पदके मिळण्याची अपेक्षा आनंदने व्यक्त केली. ‘‘मी अनेक खेळाडूंशी चर्चा केली. त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा जाणवली. बॅडमिंटनपटू आणि नेमबाजांकडून इतरांप्रमाणे मलाही जास्त अपेक्षा आहे,’’ असे आनंद म्हणाला. सुशील कुमार व नरसिंग यादव वादाबद्दल त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
सदिच्छादूताचा प्रस्ताव नाही
‘‘ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाचा सदिच्छादूत म्हणून अद्याप भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून विचारणा करण्यात आलेली नाही, परंतु ही भूमिका साकारायला आवडेल,’’ असे आनंद म्हणाला.
आयुष्यात ध्येय महत्त्वाचे
‘‘काही तरी ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन आयुष्य जगण्यात आनंद आहे. मग ते ध्येय फार मोठे नसले तरी चालेल. लहान लहान ध्येय पूर्ण करून मोठी मजल मारा,’’ असा कानमंत्र आनंदने दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 3:22 am

Web Title: viswanathan anand diplomatic answer on retirement
टॅग Viswanathan Anand
Next Stories
1 दमदार कामगिरीसाठी भारतीय नेमबाज सज्ज
2 पूजा राणी उपउपांत्यपूर्व फेरीत
3 APPLE चे CEO टीम कुकनी प्रचंड उकाड्यात लुटला क्रिकेटचा आनंद
Just Now!
X