भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदला ग्रेनके क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या अकादिज नैदितिशने बरोबरीत रोखून अनपेक्षित निकाल नोंदविला.
आनंद याला या लढतीमधील शेवटच्या टप्प्यात अपेक्षेइतकी चांगली व्यूहरचना करता आली नाही, त्यामुळेच डावावर नियंत्रण मिळूनही त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. आनंदकडे पांढरे मोहरे होते, मात्र नैदितिशच्या चिवट लढतीमुळे त्याचे डावपेच असफल ठरले. आनंदला पहिल्या डावातही फॅबिआनो कारुआना या इटलीच्या खेळाडूविरुद्धही बरोबरी स्वीकारावी लागली होती.
आठ खेळाडूं्च्या या स्पर्धेतील अन्य दोन सामने बरोबरीत सुटले. कारुआनाला फ्रान्सच्या एटिनी बॅक्रोटविरुद्ध विजय मिळविता आला नाही. या लढतीत त्याला अध्र्या गुणावर समाधान मानावे लागले. आनंद, कारुआना, आरोनियन, बारामिझ व नैदितिश यांचा प्रत्येकी एक गुण आहे. अ‍ॅडम्सला फक्त अर्धा गुण मिळाला आहे.
ताराश डिफेन्स तंत्राच्या डावात आनंदने सुरुवातीला चांगली व्यूहरचना केली होती. डावाच्या मध्यास त्याला अपेक्षेइतके डावपेच करता आले नाहीत. डावाच्या शेवटी आनंदकडे दोन हत्ती तसेच प्यादी होती. नैदितिशच्या प्याद्यांची स्थिती विस्कळित असूनही आनंदला त्याचा फायदा घेता आला नाही. अखेर ५३व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली.