भारताचा पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदची बरोबरी पाठ सोडत नाही, असे सध्या दिसून येत आहे. आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेतील आठव्या फेरीत त्याने लेव्हॉन अरोनियनविरुद्ध बरोबरी स्वीकारून  जेतेपद पटकावण्याच्या आशा कायम राखल्या. या  स्पर्धेत पाच गुणांसह त्याने अरोनियनसह संयुक्त आघाडी घेतली.
अर्मेनियाच्या अरोनियनला आनंदविरुद्धच्या पहिल्या डावात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आठव्या फेरीत पांढऱ्या मोहरांचा फायदा त्याला घेता आला नाही. त्याने सावध खेळ केला. आनंदने आक्रमणाला चांगली व्यूहरचना मिळावी, म्हणून कॅसलिंगही केले मात्र डाव विकसित होण्यापूर्वीच दोन्ही खेळाडूंनी केवळ १९ चालींमध्ये बरोबरी स्वीकारली.
शाख्रीयार मामेद्यारोव्हने आपल्यापेक्षा अनुभवात वरचढ असलेल्या व्हेसेलिन टोपालोव्हला बरोबरीत रोखून अनपेक्षित धक्का दिला. दिमित्री आंद्रेकीन यानेही व्लादिमीर क्रॅमनिकला बरोबरीत रोखून सनसनाटी कामगिरी केली. सर्जी कार्याकिनने तब्बल ८२ चालींपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत पीटर स्विडलरवर रोमहर्षक विजय नोंदविला.
आठव्या फेरीतील निकाल :
विश्वनाथन आनंद बरोबरी वि. लेव्हॉन अरोनियन
शाख्रीयार मामेद्यारोव्ह बरोबरी वि. व्हेसेलिन टोपालोव्ही
पीटर स्विडलर पराभूत वि. सर्जी कार्याकिन
व्लादिमिर क्रॅमनिक बरोबरी वि. दिमित्री आंद्रेकीन  
बरोबरीचे आनंदकडून समर्थन
आरोनियन याच्यविरुद्धच्या डावातील बरोबरीचा पर्याय योग्यच होता. कारण त्याच्याविरुद्ध पहिला डाव मी जिंकला होता. त्यामुळे पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तो काळजी घेत होता. तसेच तो पांढऱ्या मोहरांनी खेळत असल्यामुळे त्याचा फायदा त्याला मिळण्याची शक्यता होती. म्हणूनच त्याचा बरोबरीचा प्रस्ताव मी लगेच मान्य केला.

गुणतालिका
खेळाडू        गुण
विश्वनाथन आनंद    ५
लेव्हॉन अरोनियन    ५
व्लादिमिर क्रॅमनिक    ४.५
पीटर स्विडलर    ३.५
शाख्रीयार मामेद्यारोव्ह    ३.५
दिमित्री आंद्रेकीन    ३.५
व्हेसेलिन टोपालोव्ह    ३.५
सर्जी कार्याकिन    ३.५