भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने ४५ वा वाढदिवस साजरा करताना इटलीच्या फॅबिआनो कारुआना याला बरोबरीत रोखले आणि लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत आपले आव्हान राखले. आनंदने पहिल्या फेरीत व्लादिमीर क्रामनिक याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली होती. आनंदला कारुआना या तुल्यबळ खेळाडूविरुद्ध अपेक्षेइतकी आक्रमणाची योग्य संधी मिळाली नव्हती. क्वीन्स गॅम्बिटच्या डावात कारुआना याने कल्पकतेने बचाव करीत आनंदला विजय मिळविण्यापासून वंचित ठेवले. आनंदचे आता दोन गुण झाले आहेत तर क्रामनिकने एक गुणासह आपले खाते उघडले. रशियाच्या क्रामनिकने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याला पराभूत करीत अनीष गिरी याच्या साथीत संयुक्त आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. गिरी याने मायकेल अ‍ॅडम्सवर मात केली. अ‍ॅडम्सचे तीन गुण झाले आहेत. या स्पर्धेत डाव जिंकणाऱ्या खेळाडूस तीन गुण, तर बरोबरीसाठी एक गुण दिला जातो.