विक आन झी : पाच वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरणाऱ्या विश्वनाथन आनंदला टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने ९ गुणांसह या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

आनंदला १३व्या आणि अखेरच्या फेरीत भारताचा ग्रँडमास्टर विदीत गुजराथीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. त्यामुळे आनंदला तीन विजय, एक पराभव आणि नऊ बरोबरींसह ७.५ गुणांनिशी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर मजल मारता आली. या कामगिरीमुळे आनंदच्या खात्यात सहा रेटिंग गुण जमा झाले असून तो जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

कार्लसनने अपेक्षितपणे या स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना हॉलंडच्या अनिश गिरीला अखेरच्या फेरीत बरोबरीत रोखले. काळ्या मोहऱ्यांसह स्वेश्निकोव्ह बचाव पद्धतीने खेळणाऱ्या कार्लसनने कोणताही धोका न पत्करता सातव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले. गिरीने ८.५ गुणांसह दुसरे तर आनंद, रशियाचा इयान नेपोमनियाची आणि चीनचा डिंग लिरेन यांनी संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. विदीत गुजराथीने दोन पराभव, तीन विजय आणि आठ डाव बरोबरीत अशी सर्वोत्तम कामगिरी करताना ७ गुणांसह सहावे स्थान प्राप्त केले. या कामगिरीसह नाशिकच्या विदीतने २७०० रेटिंग गुणांच्या खेळाडूंमध्ये स्थान पटकावले.

रशियाच्या व्लादिमीर क्रॅमनिकवर गेल्या २७ वर्षांत पहिल्यांदाच २४ रेटिंग गुण गमावण्याची नामुष्की ओढवली. सुमार कामगिरीमुळे क्रॅमनिकची जागतिक क्रमवारीतील अव्वल १५ जणांच्या यादीतून गच्छंती झाली आहे.