रशियाच्या अलेक्झांडर ग्रिसच्यूकला विजेतेपद
माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला जागतिक शीघ्रगती (ब्लिट्झ) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेतही आपली छाप पाडण्यात अपयश आल्यामुळे २२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अखेरच्या दिवसातील १० लढतींपैकी आनंदने एकही गमावली नाही, परंतु बऱ्याचशा बरोबरीत सोडवल्या.
या स्पध्रेच्या पहिल्या दिवशी पाच वेळा विश्वविजेत्या आनंदने ११ पैकी ६.५ गुण कमवले होते. अखेरच्या दिवशीसुद्धा सात लढतींत बरोबरीत आणि तीन जिंकून तितकेच गुण संपादन केले. त्यामुळे त्याच्या खात्यावर एकूण १३ गुण जमा झाले. आता स्पेनमधील बिलबाओ येथे महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या बिलबाओ मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत आनंद गतविजेता म्हणून उतरणार आहे.
ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णाने १२ गुण मिळवून भारतीयांपैकी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. कृष्णन शशिकिरणपेक्षा त्याने अर्धा गुण अधिक मिळवला. सूर्यशेखर गांगुली आणि विदित गुजराती यांनी प्रत्येकी ११ गुण मिळवले. बी. अधिबानने १०.५ आणि एस. पी. सेतुरामनने ९.५ गुण मिळवले.
रशियाचा ग्रँडमास्टर अलेक्झांडर ग्रिसच्यूकने २१ लढतींमधून १५.५ गुणांची कमाई केली. त्याने पाच लढती अनिर्णित राखल्या आणि १३ लढती जिंकल्या. फ्रान्सच्या मॅक्झिमे व्हॅचिअर-लॅग्रेव्हने टायब्रेकरमध्ये रशियाच्या व्लादिमिर क्रामनिकवर मात करून दुसऱ्या क्रमांकावर नाव कोरले.
नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने शास्त्रीय आणि जलदगती बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद काबीज केले आहे. परंतु शीघ्रगती बुद्धिबळात तो आपला ठसा उमटवू शकला नाही. १४ गुण मिळवणाऱ्या कार्लसनला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.