भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने क्रमवारीत आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या फॅबिआनो कारुआना याच्याशी बरोबरी केली आणि नॉर्वे चषक बुद्धिबळ स्पर्धेत समाधानकारक सुरुवात केली. व्हॅसेलीन तोपालोव्ह याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला. कारुआना याने बर्लिन डिफेन्स तंत्राचा उपयोग करीत आनंदच्या आक्रमक चाली रोखण्यात यश मिळविले. आनंदनेही कारुआना याच्यावर फारसा दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही. डावाच्या शेवटी दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी एक विरोधी रंगाचा उंट होता. आनंदला या डावात पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा फायदा घेता आला नाही.