जगज्जेतेपदाच्या लढतीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर भारताचा पाच वेळा विश्वविजेता ठरलेला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद संपला आहे, अशी टीका सातत्याने होत होती. मात्र टीकाकारांना चोख उत्तर देत आनंदने आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदासाठी आपले पारडे जड केले आहे. १२व्या फेरीअखेर आनंदने घेतलेली एका गुणाची आघाडी निर्णायक ठरणार आहे.
या स्पर्धेतील बारा फेऱ्यांअखेर आनंदचे ७.५ गुण असून अर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन ६.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. १३व्या फेरीत आनंदला रशियाच्या सर्जी कार्याकीनविरुद्ध खेळावे लागणार आहे. या डावात आनंदला काळय़ा मोहरांनी खेळावे लागेल. कार्याकीनशी झालेल्या पहिल्या डावात आनंदने बरोबरी पत्करली होती. १४व्या फेरीत आनंदपुढे रशियाच्याच पीटर स्विडलरचे आव्हान असेल. जेतेपदाच्या उंबरठय़ावर असल्यामुळे आनंदसाठी पुढील दोन्ही लढती महत्त्वपूर्ण आहेत.