News Flash

आनंदचे साम्राज्य संकटात

‘एका महान युगाचा अंत झाला,’ अशा प्रकारचे मी काही तरी लिहू शकतो; परंतु चमत्काराने भारलेले भारतीय चित्रपट बघायची सवय झालेल्या आपल्या भाबडय़ा

| November 22, 2013 03:49 am

‘एका महान युगाचा अंत झाला,’ अशा प्रकारचे मी काही तरी लिहू शकतो; परंतु चमत्काराने भारलेले भारतीय चित्रपट बघायची सवय झालेल्या आपल्या भाबडय़ा मनाला अजूनही आयत्या वेळी काही तरी घडेल आणि विश्वनाथन आनंदचे जगज्जेतेपण टिकून राहील, अशी आशा आहे. आव्हानवीर मॅग्नस कार्लसनने अतिशय उत्तम प्रकारचा बचाव करून आनंदचा हल्ला मोडून काढला आणि ६-३ फरकाने निर्णायक आघाडी घेतली. आता आव्हानवीराला आनंदचे जगज्जेतेपद हिरावून घेण्यासाठी फक्त अध्र्या गुणाची गरज आहे. आणि चक्क ३ डाव उरले आहेत.
अपेक्षेप्रमाणे आनंदने काळ्या राजावर हल्ला चढवून काही काळ मॅग्नस कार्लसनला संकटात टाकले होते, पण लंडनच्या पराभवानंतर मॅग्नस नक्कीच काही शिकला आहे. त्याने आपल्या घोडय़ावर बचावाची जबाबदारी टाकली आणि त्या घोडय़ाने मॅग्नसची निराशा केली नाही. खरा म्हणजे तो घोडा होता काळ्या राजाचा संरक्षक! पण त्याने आश्चर्यकारक उडय़ा मारून वजिराची बाजू सावरली आणि पुन्हा परत येऊन राजाचे रक्षण केले.  
आनंदची परिस्थिती इतकी चांगली वाटत होती की, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू लेवोन अरोनियन, चौथा क्रमांक मिळवणारा हिकारू नाकामुरा यांनाही आनंदच्या विजयाची आशा वाटत होती. परंतु २३व्या खेळीला ४० मिनिटे घेऊन आनंदने त्याला विजय दिसत नसल्याचे जणू काही सूचित केले. शेवटी मॅग्नसने दुसरा वजीर करून अवघ्या २८व्या चालीत आनंदला शरण येण्यास भाग पाडले.
कमीत कमी विश्वविजेत्याने फार उशीर झाल्यावर का होईना, पण आक्रमक पावित्रा घेतल्याने दूरदर्शन, यूटय़ूब, इंटरनेटवरून या सामन्याचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांना चमकदार लढत बघण्याचा योग आला. आनंदच्या हल्ल्याला मॅग्नस कार्लसनने ज्याप्रकारे तोंड दिले ते पाहता लहान खेळाडूंना खूप काही शिकता आले असेल. विशेष करून जगज्जेतासुद्धा घोडचूक करून डाव हरू शकतो, हे पाहायला मिळाल्यामुळे थोर खेळाडूंचे पायही मातीचे असतात हे आपल्या लक्षात आले.
एक गोष्ट मात्र मला खटकते की, आनंदला या सामन्यात एकही डाव जिंकता आलेला नाही. जगज्जेतेपदाच्या सुमारे १५० वर्षांच्या इतिहासात असे केवळ दुसऱ्या वेळीच घडते आहे. २७ वष्रे जगज्जेतेपद मिरवल्यानंतर १९२१ साली वयाच्या ५२ व्या वर्षी  डॉ. इमॅन्युएल लास्करसारख्या महान खेळाडूवर कॅपाब्लंकाविरुद्ध एकही विजय न मिळवता पराभवाची नामुष्की ओढवली होती.
आता १०वा डाव शेवटचा ठरतो की आपले जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी आनंद पुन्हा एकदा शर्थीचा लढा देतो हेच बघू या!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 3:49 am

Web Title: viswanathan anand kingdom of chess in danger
टॅग : Chess,Viswanathan Anand
Next Stories
1 हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायना गारद
2 अखेरच्या स्थानावर उरुग्वेची मोहोर
3 इंग्लंडसाठी ‘ब्रॉड’ दिवस
Just Now!
X