पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला कँडिडेट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेच्या दहाव्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या फॅबिआनो कारूआनाने आनंदचा पराभव केला.
आनंदने नियंत्रित चाली रचल्या नाहीत. त्यामुळेच आपल्याहून वयाने बऱ्याच लहान असलेल्या कारूआनाला चांगली लढत आनंद देऊ शकला नाही. स्पध्रेच्या चार फेऱ्या शिल्लक असताना कारूआना आणि कर्जकिन प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत, तर साडेपाच गुणांसह आनंद एकटा तिसऱ्या स्थानावर आहे. पाच गुणांनिशी लेव्हॉन अरोनियन (अर्मेनिया) चौथ्या स्थानावर आहे.
कारूआनाने इंग्लिश ओपनिंग पद्धतीचा वापर करून आनंदला नेस्तनाबूत केले. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या आनंदचा कारूआनाने अतिशय तयारीनिशी सामना केला. पुढील सामन्यात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी तो कर्जकिनशी लढणार आहे. आनंदने पुढील फेरी जिंकली नाही, तर पुढील तीन फेऱ्यांमध्ये आघाडी मिळवणे आनंदला कठीण जाईल.