आत्मविश्वासाने खेळ करणाऱ्या विश्वनाथन आनंद या भारतीय खेळाडूने शाख्रीयर मामेद्यारोव्ह याला बरोबरीत रोखले आणि आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेतील दहाव्या फेरीअखेर एक गुणाची आघाडी घेतली. त्याचे आता साडेसहा गुण झाले आहेत. 

लेव्हॉन आरोनियन याने साडेपाच गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे तर सर्जी कार्याकीन, मामेद्यारोव्ह, पीटर स्वेडलर यांचे प्रत्येकी पाच गुण झाले आहेत. स्वेडलर याने व्लादिमीर क्रामनिक याच्यावर आश्चर्यजनक विजय नोंदविला. आरोनियन याने व्हेसेलीन टोपालोव्ह याला बरोबरीत रोखून अनपेक्षित धक्का दिला. कार्याकीन व दिमित्री आंद्रेकीन यांच्यातील डाव बरोबरीत सुटला.
शाख्रीयरविरुद्ध आनंदने राजाच्या पुढील प्याद्याच्या साहाय्याने डावाची सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी सुरेख डावपेच करण्याचा प्रयत्न केला. १५ व्या चालीस आनंदने कॅसलिंग करीत राजा सुरक्षित केला. १८ व्या चालीस शाख्रीयरने कॅसलिंग करीत राजा सुरक्षित केला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी डावपेच करण्यासाठी चांगली स्थिती मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र सावध खेळामुळे दोन्ही खेळाडूंना अपेक्षेइतकी संधी मिळाली नाही. त्यामुळे ३० व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली.
अर्मेनियाचा खेळाडू लेव्हॉन आरोनियन याने टोपालोव्ह याच्याविरुद्ध डावाच्या मध्यास खेळावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तथापि, टोपालोव्ह याने त्याचे हे आक्रमण सहज परतविले. डावातील गुंतागुंत वाढल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी ४५ व्या चालीस अर्धा गुण स्वीकारला.
स्वेडलर व क्रामनिक यांच्यातील लढतीविषयी कमालीची उत्सुकता होती. दोन्ही खेळाडूंनी कल्पक चाली करीत डावावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. ३२ व्या चालीस क्रामनिकने केलेली घोडचूक स्वेडलरच्या पथ्यावर पडली. तेथून स्वेडलर याने वजीराच्या साहाय्याने जोरदार आक्रमण करीत क्रामनिकचा बचाव हाणून पाडला. ३९ व्या चालीस राजा वाचविण्यासाठी दोन मोहरे गमवावे लागणार हे लक्षात आल्यामुळे क्रामनिकने पराभव मान्य केला.
कार्याकीन याने या स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फारसा धोका न पत्करता खेळण्यावरच आंद्रेकीन याने भर दिला. २९ व्या चालीस दोन्ही खेळाडूंकडे प्यादी व मोहरे यांची समान स्थिती होती. आक्रमणास फारशी संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यामुळे दोन्ही खेळांडूंनी बरोबरी मान्य केली.