विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात; जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील प्रवेशही धोक्यात

जग्गजेताचा किताब पाच वेळा नावावर करणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला शुक्रवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. दुसऱ्या फेरीतील परतीच्या लढतीत विजयाची आवश्यकता असताना कॅनडाच्या अँटोन कोव्हालीयोव्हने भारताच्या ग्रँडमास्टरला बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे आनंदचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर २०१८मध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपदाच्या सामन्यातील प्रवेश धोक्यात आला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेत त्याला थेट प्रवेश मिळाला, तर त्याला जागतिक स्पर्धेची पात्रता मिळवता येईल.

विश्वचषक स्पर्धेत १५ वर्षांनंतर खेळणाऱ्या आनंदला कोव्हालीयोव्हविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्याला परतीच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र ३१ चालींच्या खेळानंतरही आनंदला विजय मिळवता आला नाही आणि त्याने बरोबरीवर समाधान मानले. या स्पर्धेचे जेतेपद पटकावून पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाच्या लढतीत खेळण्याचा निर्धार आनंदने केला होता, परंतु त्याला थेट प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागेल. नियमानुसार कँडिडेट्स स्पर्धेसाठी एक थेट प्रवेश देण्यात येतो आणि तो आनंदला मिळाल्यास त्याच्या जागतिक अजिंक्यपदाच्या सामन्यात खेळण्याच्या आशा पल्लवित होऊ शकतात. मात्र तसे न झाल्यास त्याला २०२०च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची वाट पहावी लागेल.

दरम्यान, ग्रँडमास्टर विदित गुजराथीने परतीच्या लढतीत व्हिएतनामच्या ले क्वँग लिएमला बरोबरीत रोखून १.५-०.५ अशा फरकाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ग्रँडमास्टर बी. अधिबानने सलग दुसऱ्यांदा रशियाच्या इयान नेपोम्नीएचट्चीला बरोबरीत रोखले आणि दोघांना टायब्रेकर सामना खेळावा लागणार आहे. एस. पी. सेतुरामन आणि पेंटाला हरिकृष्णा यांच्यातील लढतही बरोबरीत सुटल्याने दोघांना टायब्रेकर सामना खेळावा लागेल. आनंदसह गतविजेता सर्जी कर्जाकिन (रशिया) आणि मिचेल अ‍ॅडम (इंग्लंड) या दिग्गज खेळाडूंचे आव्हानही संपुष्टात आले. कर्जाकिनला रशियाच्याच डॅनिल दुबोव्हकडून, तर अ‍ॅडम्सला इस्रायलच्या मॅक्सिम रोडशटेइनकडून पराभव पत्करावा लागला.