विश्वविजेतेपदाच्या लढतीतील पराभवाची कसर लंडन बुद्धिबळ स्पर्धेत भरून काढण्याचे विश्वनाथन आनंदचे स्वप्न रविवारी उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. दोन डावांच्या लढतीत रशियाच्या व्लादिमीर क्रामनिकने त्याच्यावर १.५-०.५ अशी मात केली.
बाद फेरीत दिमाखदार विजय मिळवणाऱ्या आनंदने क्रामनिकविरुद्ध पहिल्या डावात  सुमार दर्जाचा खेळ केला. त्याला क्रामनिकविरुद्ध अपेक्षेइतका अव्वल दर्जा दाखविता आला नाही. आनंदने क्रामनिकविरुद्ध वजिराच्या पुढील प्याद्याने सुरुवात केली. क्रामनिकने त्याला तराश बचावात्मक पद्धतीने उत्तर दिले. १५व्या चालीला आनंदने केलेली चूक क्रामनिकच्या पथ्यावर पडली. क्रामनिकने डावावरील पकड भक्कम करण्याचा प्रयत्न केला. २०व्या चालीला आनंदने एक मोहरा गमावला. त्यामुळे आनंदला पराभव मान्य करावा लागला. दुसऱ्या डावात आनंदने चांगला खेळ करत डाव बरोबरीत ठेवला. मात्र पहिल्या डावातील पराभवामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले. २००८मध्ये विश्वविजेतेपदाच्या लढतीत आनंदने क्रामनिकला पराभूत केले होते.