पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा उठवता आला नाही. त्यामुळे आठव्या डावात आनंदला जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध पुन्हा एकदा बरोबरी पत्करावी लागली. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या या लढतीत आनंद आता ३.५-४.५ असा एका गुणाने पिछाडीवर पडला आहे.
आनंदसारखा कार्लसन चांगल्या तयारीसाठी ओळखला जात नाही. पण आनंदच्या चालींना कार्लसनने तोडीस तोड उत्तर दिले. डावाची सुरुवात आनंदला भक्कमपणे करता आली नाही. त्याचबरोबर डावाच्या मध्यातही त्याला सुरेख खेळाचे प्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे जगज्जेतेपद पुन्हा एकदा कार्लसनच्या बाजुने झुकले आहे.
आनंदने सुरुवातीच्या काही चालींसाठी बराच वेळ घेतला, त्यावरून कार्लसनच्या ‘सपोर्ट टीम’ने भरपूर मेहनत घेतल्याचे दिसून आले. कार्लसनने पाचव्या चालीला कॅसलिंग केल्यानंतर सातव्या चालीला आनंदने त्याचे प्यादे घेतले. दोघांनीही एकमेकांचे प्यादे मिळवत १५व्या चालीला आनंदने कॅसलिंग केले. २४व्या चालीला वजिरा-वजिरी झाल्यानंतर हा डाव बरोबरीकडे झुकणार, हे स्पष्ट झाले होते. २९व्या चालीला दोघांकडे राजा, उंट, घोडा आणि प्रत्येकी पाच प्यादी अशी स्थिती होती.
प्यादे आणि राजाच्या साहाय्याने आनंदने डावाच्या अखेरीस कार्लसनवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण ४१व्या चालीला दोघांनी बरोबरी मान्य केली. आनंदने जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्याचे डावपेच यशस्वी होऊ शकले नाहीत. लढतीनंतरच्या पत्रकार परिषदेतही आनंद फार काही बोलला नाही. पण कार्लसनच्या डावपेचांनी आनंद त्रस्त असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून जाणवत होते.
‘‘डावाच्या मध्यात आनंदची स्थिती चांगली होती. अखेरच्या क्षणीही आनंद मजबूत स्थितीत होता. पण आनंदला हा डाव जिंकता आला नसता,’’ असे ग्रँडमास्टर अभिजित गुप्ताने सांगितले.

100