आपल्या कारकिर्दीतला सर्वात वाईट बचाव करून विश्वविजेत्या आनंदने आपला सहावा डावपण गमावला आणि अवघे सहा डाव उरले असताना आव्हानवीर मॅग्नस कार्लसनला ४-२ अशी जवळपास निर्णायक आघाडी दिली. राष्ट्रकुल विजेत्या अभिजित गुप्ताने आज सांगितले की, शुक्रवारी रात्री आनंद झोपला नव्हता. शनिवारी रात्री जगज्जेत्याची काय अवस्था असेल, याची कल्पना आपल्याला करता येईल.
स्पॅनिश प्रकाराची सुरुवात बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात जुनी पद्धत मानली जाते. कारण रॉय लोपेझ दी सेगुरा या स्पॅनिश धर्मगुरूने १५६१ साली या प्रकाराचा पद्धतशीर अभ्यास करून त्यावर १५० पानी पुस्तिका काढली होती. या प्रकारात काळ्या मोहऱ्या घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला बरोबरी साधणेही कठीण मानले जात असे. म्हणून काही खेळाडू त्याला काळ्याची स्पॅनिश छळणूक असेही म्हणतात. आजचा आनंदचा सपक खेळ बघता मॅग्नसने त्याचे पांढऱ्याची स्पॅनिश छळणूकमध्ये रूपांतर केले, असे म्हणायला काही हरकत नाही.
आनंदने मॅग्नसच्या बíलन बचावविरुद्ध काहीही शोधलेले नाही, हे त्याने खेळलेल्या चौथ्या खेळीलाच सर्वाच्या लक्षात आले. मग जगज्जेत्याने डावात अनेक वेळा खेळाची गती वाढवून खेळात चतन्य आणण्याच्या संधीसुद्धा वाया घालवल्या. उदाहरणार्थ त्याला ११व्या खेळीला उंटांची मारामारी करता येत होती किंवा त्याच खेळीत आनंदला उंटाने वजिराच्या बाजूच्या घोडय़ावर हल्ला करून मॅग्नसच्या मागेच योग्य खेळ्या शोधायची कटकट लावता आली असती. परंतु त्याने उगाचंच घोडे आणि उंट पुढे नेले आणि त्यांच्या मारामाऱ्या झाल्यावर मॅग्नसलाच वरचष्मा मिळाला.
नंतर प्यादे फुकट देण्याची आनंदला काहीही गरज नव्हती. निष्क्रिय बचाव करत आनंद नुसता बसून राहिला असता तरी त्याला मॅग्नसलाच दमवण्याची संधी होती. त्या वेळी त्याला हरवणे मॅग्नसला शक्य झाले नसते. तरीही आनंदने जगज्जेत्याला साजेसा खेळ करत डाव बरोबरीपर्यंत खेचत आणला होता; परंतु ६०व्या खेळीला केलेली घोडचूक त्याला महाग पडली आणि आव्हानवीराने २ गुणांची आघाडी घेतली.
आनंदने अनेक नवे सहकारी आपल्या संघात घेतले आहेत; पण त्यांना मॅग्नसचा बचाव भेदणारे अस्त्र अजून मिळालेले नाही. सोमवारी आनंद काय करतो, याचीच सर्वाना उत्सुकता लागली आहे.