भारताच्या माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने अखेरच्या १४व्या फेरीत पीटर स्विडलरला बरोबरीत रोखून आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत अपराजित्व राखून निर्विवाद वर्चस्व गाजवले. आनंदने शनिवारीच स्पर्धेतील विजेतेपदासह ‘आव्हानवीर’ होण्याचा मान मिळविला होता. तो विश्वविजेतेपदासाठी पुन्हा मॅग्नस कार्लसनशी खेळणार आहे.
आनंदने शेवटच्या फेरीत स्विडलरला ३४ चालींमध्ये बरोबरीत रोखले. चौदाव्या फेरीअखेर त्याने ८.५ गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सर्जी कार्याकीनने ७.५ गुणांसह उपविजेतेपद मिळवले. कार्याकीनने लेव्हॉन अरोनियनवर ९४व्या चालीला रोमहर्षक विजय मिळवला. व्लादिमीर क्रॅमनिक, दिमित्री आंद्रेकीन व शाख्रीयार मामेद्यारोव्ह यांचे प्रत्येकी ७ गुण झाले. क्रॅमनिकला मामेद्यारोव्हने केवळ ३० चालींमध्ये बरोबरीत रोखले. अरोनियन व स्विडलर यांना प्रत्येकी ६.५ गुणांवर समाधान मानावे लागले. व्हेसलिन टोपालोव्हला शेवटचे स्थान मिळाले. त्याचे सहा गुण झाले. त्याला आंद्रेकीनने ६९ चालींमध्ये बरोबरीत रोखले.