मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या डावात निराशाजनक पराभव स्वीकारल्यानंतर विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत पुन्हा नव्याने उमेद राखण्यासाठी भारताच्या विश्वनाथन आनंदला दडपणाची कोंडी फोडण्याचेच आव्हान आहे.
या दोन खेळाडूंमधील बारा डावांच्या या स्पर्धेत कार्लसन याने १.५-०.५ अशी आघाडी मिळविली आहे. पहिल्या डावात आनंदने बरोबरी स्वीकारली होती, मात्र दुसऱ्या डावात त्याला पराभवास सामोरे जावे लागले होते.
पहिल्या दोन्ही डावांमध्ये आनंदला प्रारंभाच्या तंत्रात फारशी अडचण आली नव्हती. या दोन्ही डावांमध्ये शेवटच्या टप्प्यातच आनंदला दडपणाखाली आपल्या चालींवर नियंत्रण ठेवता आले नव्हते. पहिल्या डावात आनंदने नेटाने डाव खेळला असता तर त्याला हा डाव जिंकता आला असता. मात्र वेळेच्या मर्यादेत चाली करण्याच्या दडपणाखाली त्याच्याकडून नकळत चुका झाल्या. त्यामुळे त्याला योग्य संधी साधता आली नाही. अखेर त्याने बरोबरीला प्राधान्य दिले.
दुसऱ्या डावात आनंदला अपेक्षेइतकी संधीच मिळाली नाही. कार्लसन याने कल्पकतेने चाली करीत सतत त्याच्यावर दडपण ठेवले होते.
आनंद म्हणाला, ‘‘पहिल्या डावात वजीर व उंट यांच्या चालींबाबत मी संभ्रमात पडलो. त्यामुळे मला अपेक्षेइतके डावावर नियंत्रण मिळविता आले नाही. दुसऱ्या डावात माझ्याकडून नकळत काही चुका घडल्या. या चुका मला खूप महागात पडल्या. या डावात आम्हा दोघांनाही समान संधी होती. मात्र मी हत्तीची चुकीची खेळी खेळलो.’’
कार्लसन म्हणाला,‘‘मी आनंदवर दडपण आणण्याचे लक्ष्य केले होते व त्यामध्ये मी यशस्वी झालो. आनंद हा खूप अनुभवी खेळाडू आहे, मात्र काही वेळा दडपणाखाली त्याच्याकडून चुका होऊ शकतात असा अंदाज मी बांधला होता.’’
आनंद याला मंगळवारी तिसऱ्या डावात पांढऱ्या मोहरांनी खेळण्याची संधी आहे. या संधीचा लाभ तो कसा घेतो याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.