२१ वर्षीय अनिश गिरीने चौथ्या फेरीत नमवले

गतविजेत्या विश्वनाथन आनंदला बिलबाओ मास्टर अंतिम बुद्धिब स्पध्रेच्या चौथ्या फेरीत नेदरलँडचा ग्रँडमास्टर अनिश गिरीकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. २१ वर्षीय गिरीचा हा आनंदवरील क्लासिकल बुद्धिबळ प्रकारातील पहिला विजय ठरला. स्वैर खेळ आणि सुरुवातीला केलेल्या चुकांचा फटका आनंदला चौथ्या फेरीत बसला.

याआधीच्या तीन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागल्यामुळे आनंदच्या जेतेपद कायम राखण्याचा मार्गात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे गिरीविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून विजयाची अपेक्षा होती, परंतु काळ्या मोहऱ्याने खेळणाऱ्या आनंदवर गिरीने कुरघोडी केली. गिरीने इंग्लिश डावाने ओपनिंग केली. त्याने वझीर शेजारील उंटासमोरील प्याद्याची चाल केली. आनंदने त्याचे अनुकरण करताना अकराव्या चालीपर्यंत सामना समान ठेवला, परंतु ११व्या चालीत आनंदने त्याचा उंट गिरीच्या चमूत नेला आणि तेथे आनंदसमोर पेच निर्माण झाला. त्यानंतर आनंदच्या पुढच्या चाली चुकल्या. तरीही ३७व्या चालीपर्यंत आनंदने संघर्ष केला.

गिरीने या विजयाबरोबर गटात अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या वेस्लेय सोला मागे टाकले आहे. वेस्लेयला चीनच्या लिरेन डिंगविरुद्धच्या लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. वेस्लेय आणि डिंग यांनी ५३व्या चालीनंतर सामना बरोबरीत सोडविण्याचा निर्णय घेतला.