गेल्या दोन फेऱ्यांमध्ये शानदार खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या विश्वनाथन आनंदचा आत्मविश्वास गगनाला भिडला असून एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पाचव्या फेरीत आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळण्याचा फायदा मिळणार आहे. नॉर्वेच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध रंगणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत आनंदचे पारडे जड मानले जात आहे. पहिल्या फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने काहीसा बचावात्मक पवित्रा घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत कार्लसनने सर्वोत्तम खेळ करत आनंदवर मात केली होती. त्यामुळे आनंद संपला, अशी चर्चा सुरू झाली होती. पण कार्लसनच्या डावपेचांचा अचूक अभ्यास करत आणि उत्तम गृहपाठ करत आनंदने तिसऱ्या फेरीत कार्लसनवर मात करत जोमाने पुनरागमन केले.