१४ वर्षांनंतर पुन्हा जलद बुद्धिबळ जग्गजेता; रशियाच्या फेडोसीव्हचा टायब्रेकरमध्ये पराभव

रशियाचा ग्रॅण्ड मास्टर व्लॅदिमिर फेडोसीव्हने रियाध येथे सुरू असलेल्या जागतिक जलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत अर्ध्या गुणांच्या आघाडीसह अव्वल स्थान पटकावले असले तरी भारताच्या ४८ वर्षीय विश्वनाथन आनंदच्या नावावर स्पर्धेचा दुसरा दिवस राहिला. माजी विश्वविजेत्या आनंदची जेतेपदाची भूक अजूनही संपलेली नाही आणि तो ७.५ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. अजूनही तीन फेऱ्या शिल्लक असून आनंदची कामगिरी पाहता तो पदक शर्यतीत स्वत:ला कायम राखण्यात नक्की यशस्वी होईल, असे चिन्ह आहे.

आनंदने गुरुवारी इंग्लंडच्या ल्युक मॅकशेन आणि विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला नमवून सर्वाचे लक्ष वेधले. आनंदसह रशियाचा १५ वर्षीय अँड्रेय एसिपेंकोनेही काही अप्रतिम खेळी करून सर्वाचे लक्ष वेधले आहे. त्याने सेर्गी कर्जाकिनचा आक्रमण अगदी सहज निष्प्रभ करत बुद्धिबळ चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. महिला गटात चीनच्या जू वेंजूनला सलग चौथ्या लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र, तीने आठ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताची द्रोणावली हरिका ७ गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

स्पर्धेचा दुसरा दिवस आनंदच्या चाहत्यांसाठी उत्साहाचा ठरला. त्याने आक्रमक खेळ न करता काही लक्ष्यवेधी चाली रचून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संयमाने खेळ करत त्याने सहाव्या फेरीत रशियाचा ग्रॅण्ड मास्टर पॅव्हेल पोंक्राटोव्हला ३३व्या चालीनंतर बरोबरी मानण्यास भाग पाडले. त्यानंतर दिवसाच्या दुसऱ्या डावात आनंदने ५२ चालीत मॅकशेनवर विजय मिळवत पूर्ण गुण कमावला. त्यानंतर आनंद आणि फेडोसीव्ह यांच्यातील लढत २३ चालींतच बरोबरी सुटली. आनंद आणि विश्वविजेता कार्लसन यांच्या लढतीने सर्वाना खिळवून ठेवले. पांढऱ्या मोहऱ्यांचा फायदा कार्लसनच्या बाजूने असला तरी आनंदच्या कौशल्यासमोर तोही फिका ठरला. आनंदने अवघ्या ३४ चालींत कार्लसनला हार मानण्यास भाग पाडले. त्यापुढील तीन फेरींमध्ये आनंदला अनुक्रमे ग्रॅण्ड मास्टर हाओ वँग, रशियाचा ग्रॅण्ड मास्टर पी. स्वीडलर आणि नेपोमनिअ‍ॅच यांच्याविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले.