भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद सलग दुसऱ्या दिवशी आपल्या फॉर्मशी झगडताना दिसला. शनिवारी झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराकडून तो पराभूत झाला.
या स्पध्रेच्या पहिल्या फेरीत लेव्हॉन अरोनियनकडून हरणाऱ्या आनंदला हा दुसरा धक्का बसला आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पध्रेत आनंद सध्या अखेरच्या स्थानावर फेकला गेला आहे. नॉर्वेच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने अरोनियनविरुद्धची लढत अनिर्णीत राखली, तर इटलीच्या फॅबियानो कारूआनाने इस्रायलच्या बोरिस गेल्फंडला बरोबरीत रोखले. या स्पध्रेतील शास्त्रीय (क्लासिकल) प्रकारातील तीन आणि झटपट (रॅपिड) प्रकारातील दोन फेऱ्या अद्याप बाकी आहेत. कार्लसन, अरोनियन आणि नाकामुरा यांच्याकडे प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडी आहे. या स्पध्रेत शास्त्रीय प्रकारातील विजयासाठी दोन तर झटपट प्रकारातील विजयासाठी एक गुण स्पर्धकाला मिळतो.
दोन्ही सामने बरोबरीत सोडवणारा करूआना दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर गेल्फंडच्या खात्यावर एक गुण जमा आहे. तथापि, आनंदने अद्याप आपले खाते उघडलेले नाही.
नाकामुराने काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना बर्लिन बचावपद्धतीचा वापर केला. कार्लसनने जगज्जेतेपदाच्या अखेरच्या लढतीत आनंदविरुद्ध हीच चाल वापरली होती. त्यामुळे सामन्याच्या मध्यावर आनंद पेचात पडला. अखेर ३६व्या चालीला नाकामुराने विजयावर शिक्कामोर्तब केले.