पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पध्रेतील आव्हान कायम राखण्यासाठी सहाव्या फेरीत रशियाच्या अॅलेक्झांडर ग्रिस्चुकचा सामना करावा लागणार आहे. तीन अनिर्णीत, एक विजय आणि एक पराभव अशा निकालासह आनंदने २.५ गुणांची कमाई केली आहे. पाचव्या फेरीत आनंदने आपली बचावात्मक शैली बदलताना व्हेसलीन टोपालोव्हचा पराभव केला. त्यामुळे सहाव्या फेरीतही त्याच्याकडून या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. हॉलंडचा अनिश गिरी, अमेरिकेचा हिकारू नाकामुरा आणि फ्रान्सच्या मॅक्सिमे व्हॅचिएर-लॅग्रेव्ह हे प्रत्येकी तीन गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहेत. आनंद अर्मेनियाच्या लेव्हॉन अॅरोनियन, विश्वविजेता मॅग्नस कार्लसन, इटलीचा फॅबिआनो कारुआना, इंग्लंडचा मिचेल अॅडम्स आणि ग्रिस्चुक यांच्यासह संयुक्तरीत्या चौथ्या स्थानावर आहे.