बुद्धिबळाचा सम्राट कोण होणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असली तरी गतविजेत्या विश्वनाथन आनंदने आपले जगज्जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने थाटात सुरुवात केली. विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या लढतीत आनंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला झटपट बरोबरीत रोखले. काळ्या मोहऱ्यांसह सुरुवात करत आनंदने आपण या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे जगाला दाखवून दिले.
पांढऱ्या मोहऱ्यांसह रेटी पद्धतीने डावाची सुरुवात करणाऱ्या कार्लसनला आनंदने डोके वर काढण्याची जराही संधी दिली नाही. अवघ्या १६ चालींमध्ये पहिला डाव बरोबरीत राखत या लढतीसाठी आपली तयारी योग्य दिशेने झाल्याचे आनंदने दाखवून दिले. आनंद चांगली सुरुवात करून मजबूत स्थितीत येईल, अशी चर्चा होती. पण आनंदने आपल्या पाठीराख्यांना निराश होऊ दिले नाही. १०व्या चालीला दोघांनीही एकमेकांचे प्यादे मिळवल्यानंतर आनंदने घोडय़ांसह काही चाली केल्या. त्यामुळे कार्लसनला आपला वजीर वाचवण्यासाठी तीन वेळा वजीर मागे घ्यावा लागला. पुन्हा-पुन्हा त्याच चाली होत गेल्यानंतर दोघांनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले. आता रविवारी होणाऱ्या दुसऱ्या डावात आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याची संधी मिळणार आहे.
२००७पासून बुद्धिबळातील अनभिषिक्त सम्राट असलेल्या आनंदसाठी हा खडतर काळ असल्याचे भाकीत बुद्धिबळपंडितांनी व्यक्त केले होते. पण पहिल्या डावानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आनंद म्हणाला, ‘‘काळ्या मोहऱ्यांसह सहजपणे बरोबरी पत्करता आली, यामुळे मी आनंदी आहे. पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे पुढील ११ डावांत काय होईल, हे सांगणे कठीण आहे.’’ कार्लसननेही पहिल्या डावात बरोबरी साधल्यानंतर समाधान व्यक्त केले. ‘‘यापूर्वी मी पांढऱ्या मोहऱ्यांचा फायदा घेण्याऐवजी वाईट परिस्थितीत डाव बरोबरीत सोडवले होते. त्यामुळे हा डाव बरोबरीत सोडवल्याने मी खूश आहे.’’ या बरोबरीमुळे दोघांनाही अर्धा गुण मिळाला आहे.
अन् विश्वनाथनच्या चेहऱ्यावर ‘आनंद’ पसरला!
चेन्नई : दडपण, दबाव आणि गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला खडतर सराव आणि मेहनत, यामुळे विश्वविजेतेपदाच्या लढतीची विश्वनाथन आनंद चातक पक्ष्याप्रमाणे आतुरतेने वाट पाहत होता. पण पहिल्या डावाला सुरुवात झाली आणि आनंदने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या मॅग्नस कार्लसनला सहजपणे बरोबरीत रोखले. त्यानंतर विश्वनाथनच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ‘आनंद’ पसरला होता. ‘‘गेले काही महिने फक्त आणि फक्त बुद्धिबळाचाच विचार करताना डोके सुन्न झाले होते. पण अखेर ही लढत सुरू झाली आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता मी या लढतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या डावात चांगली सुरुवात करता आली, याचे समाधान वाटते. आता मला दुसऱ्या डावासाठी सज्ज व्हावे लागणार आहे,’’ असे आनंदने सांगितले. कार्लसन म्हणाला, ‘‘पहिला डाव जरी लवकर संपला तरी पुढील काही दिवसांत तुम्हाला दीड तासांपेक्षा जास्त तास खेळ पाहायला मिळेल, एवढे नक्की. १०व्या चालीनंतर सामन्यातील रंगत निघून गेली होती. त्यामुळेच मी बरोबरी पत्करण्याचे ठरवले.’’