विश्वनाथन आनंदचा अफाट अनुभव वि. वेगळीच ऊर्जा असणारा मॅग्नस कार्लसन यांच्यात विश्वविजेत्याचा मुकुट कोण पटकावणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचू लागली आहे. शेरास सव्वाशेर असणाऱ्या या दोघांनी अजून आपल्या भात्यातील अचूक चालींचा नजराणा बाहेर काढला नसला तरी आनंदसाठी शुक्रवारी रंगणारा पाचवा डाव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काळ्या मोहऱ्यांसह खेळताना आनंदने पाचव्या डावात सावध खेळ केला, तर पुढील दोन डावांत आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याची संधी मिळणार आहे.
विश्वविजेतेपदाच्या लढतीतील पहिले चार डाव बरोबरीत सुटले असले तरी खेळाची किंवा चालींची पुनरावृत्ती झाल्याचेच दिसून येते आहे. पाचव्या डावानंतर जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या नियमांनुसार, आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळता येणार असल्यामुळे सहाव्या आणि सातव्या डावात तो कार्लसनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या डावात आनंदने कार्लसनला वरचढ होण्याची कोणतीही संधी न देता १६ चालींमध्ये बरोबरी पत्करली होती. आनंदने कारो कान बचाव पद्धतीसह खेळताना दुसऱ्या डावात चांगला खेळ केला, पण चांगल्या तयारीनिशी आलेल्या कार्लसनने त्याला चोख उत्तर दिले होते. तिसऱ्या डावातही आनंदने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना कार्लसनला बरोबरी पत्करण्यास भाग पाडले होते. चौथ्या डावात कार्लसन विजयाच्या उंबरठय़ापाशी येऊन पोहोचला होता, पण आनंदने आपला अनुभव पणाला लावत वेळ मारून नेली होती.
आनंदच्या खेळाचा चांगलाच अभ्यास करणारा कार्लसन आता आनंदला गृहीत धरू लागला आहे. त्यामुळे तो पुढील दोन डावांत सिसिलियन किंवा फ्रेंच बचाव पद्धतीचा वापर करेल, अशी शक्यता आहे. बुद्धिबळाच्या खेळात काळा रंग काहीसा नावडता मानला जातो. त्यामुळे पाचव्या डावात आनंदला पुन्हा एकदा दमदार कामगिरी करावी लागणार आहे.