जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याने येथे आयोजित करण्यात आलेल्या ताल चषक आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळवले. त्याने एक गुणाच्या फरकाने हे यश मिळवताना आपले वर्चस्व सिद्ध केले.

या स्पर्धेत अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश असल्यामुळे आनंदची कामगिरी विशेष मानली जात आहे. त्याने दहा फे ऱ्यांमध्ये सहा गुणांची कमाई केली. त्यामध्ये त्याने दानिला दुबोव्ह, इयान नेपोम्निचिछी, हिकारू नाकामुरा व अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचूक यांच्यावर शानदार विजय मिळवला. त्याने बोरिस गेल्फंड, पीटर स्वीडलर, व्लादिमीर क्रामनिक व सर्जी कर्याकीन या बलाढय़ खेळाडूंना बरोबरीत रोखले. त्याला फक्त शाख्रीयर मामेद्यारोव याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

मामेद्यारोवने उपविजेतेपद पटकावले. त्याने पाच गुणांची कमाई केली. गेल्फंड व नाकामुरा यांचे प्रत्येकी साडेचार गुण झाले, मात्र प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळाले. आनंदने यंदाच्या मोसमात जलद पद्धतीच्या जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत आपण चाळिशीनंतरही अव्वल यश मिळवू शकतो, हे सिद्ध केले आहे.