भारतीय क्रिकेट संघ विजयी रथावर स्वार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेला चारीमुंड्या चित केल्यानंतर एकदिवसीय सामन्यातील सलग तीन विजयाने पाच सामन्यांची मालिका भारताने खिशात घातली. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली. विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत हा नवा विक्रम नोंदवला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ७३ सामन्यांत भारताचे नेतृत्त्व करताना २३ सामने जिंकून दिले होते. विराटने सचिनचा हा विक्रम मोडीत काढला. विराटने केवळ ३२ सामन्यात सचिनला मागे टाकले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना सर्वाधिक सामने जिंकून देण्याच्या यादीत महेंद्रसिंह धोनी अव्वल स्थानी आहे. धोनीने भारतीय संघाला ११० एकदिवसीय सामने जिंकून दिले आहेत. धोनीनंतर या यादीत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा क्रमांक लागतो. अझरुद्दीन ९० सामन्यांचा निकाल भारताच्या बाजूने लावण्यात यशस्वी ठरला होता. भारतीय संघाला जिंकण्याची सवय लावणारा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखील भारतीय संघाने ७६ सामने जिंकले आहेत.

बिकट परिस्थितीत भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या राहुल द्रविडनेही अव्वल पाच कर्णधारांमध्ये आपली छाप सोडली. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४२ सामने जिंकले आहेत.
भारतीय संघाला पहिला विश्वचषक मिळवून देणारे कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३९ सामने जिंकले आहेत. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी विराटला आणखी काही वेळ आहे. मात्र दिग्गजांशी तुलना करताना विजयाच्या टक्केवारीच्या आकडेवारीत विराट सर्वच कर्णधारांपेक्षा सरस ठरतो. भारतीय संघाचा विजयाचा आलेख असाचा उंचावत राहिला तर कोहली निश्चितच एक वेगळे शिखर गाठेल यात शंका नाही.