ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००१ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात व्ही.व्ही.एस.लक्ष्मण याने केलेल्या २८१ धावांच्या खेळीस क्रिकेट कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीचा दर्जा लाभला आहे.
क्रिकेट मंथली या डिजिटल मासिकाने याबाबत समकालीन खेळाडू, समालोचक व पत्रकार यांच्याकडून नुकतीच मते मागविली होती. त्यामध्ये लक्ष्मणने केलेल्या २८१ धावांच्या खेळीस बहुमत लाभले. मालिकेत भारतीय संघ ०-१ अशा पिछाडीवर असताना लक्ष्मण याने पहिल्या डावात ५९ तर दुसऱ्या डावात द्विशतक ठोकले होते. त्यामुळेच भारतास हा सामना व त्यानंतर कसोटी मालिका जिंकता आली होती. त्याच्या या द्विशतकाबाबत शेन वॉर्न याने म्हटले आहे, मी लक्ष्मण याला त्यावेळी गोलंदाजी करीत होतो. मी त्याला अनेक फसवे चेंडू टाकले मात्र लक्ष्मण याने आत्मविश्वासाने कव्हरड्राईव्ह, मिडविकेटमधून फटके आदी विविध फटके मारून माझ्या गोलंदाजीची लयच बिघडवून टाकली होती. ‘आम्ही दोन दिवस लक्ष्मण याला गोलंदाजी करीत होतो. आमचे गोलंदाज थकले पण लक्ष्मण याची फटकेबाजी सुरूच होती. त्याला बाद करणे अवघड कामगिरी झाली होती’, असे पॉन्टिंगने सांगितले.