जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) रशियाच्या उत्तेजक प्रतिबंधक संस्थेवर (आरयूएसएडीए) निलंबनाची कारवाई केली. ‘वाडा’च्या या कारवाईमुळे रशियाच्या खेळाडूंच्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या आशा अधिक धूसर झाल्या आहेत. ‘वाडा’च्या नियमांच्या सातत्याने होत असलेल्या उल्लंघनामुळे गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वी ‘वाडा’च्या स्वतंत्र समितीने सादर केलेल्या अहवालात रशियाचे अनेक दिग्गज खेळाडू उत्तेजक सेवन करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात आरयूएसडीएचाही सहभाग असून त्यांनी परीक्षणासाठी मागितलेले खेळाडूंचे रक्ताचे नमुने नष्ट केल्याचा आरोप ‘वाडा’ने केला आहे. आंतरराष्ट्रीय संघटना अ‍ॅथलेटिक महासंघाने (आयएएएफ) याआधीच रशियावर तात्पुरती बंदीचा निर्णय घेतला आहे. ‘वाडा’च्या या निर्णयामुळे रशियावरील दबाव आणखी वाढले असून त्यांना त्वरित संस्थेत आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत.
‘वाडा’ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) नियमांनुसार उत्तेजक प्रतिबंधक सेवनाच्या नियमांचे पालन करणारे देशच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील. त्यामुळे रशियाला ऑलिम्पिक बंदी टाळायची असल्यास नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

उत्तेजक प्रतिबंधक प्रणालीची पुनर्बाधणी करणार
जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर रशियाच्या क्रीडामंत्र्यांनी देशाच्या उत्तेजक प्रतिबंधक संस्थेत सुधारणा करणार असल्याची ग्वाही दिली आहे. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी वाडाने रशियाच्या उत्तेजक प्रतिबंधक संस्थेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तातडीने, प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे वाडाला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे, असे क्रीडामंत्री व्हिटली मुत्को यांनी सांगितले. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल आणि देशातील उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची नव्याने बांधणी करण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले. रशियातील दिग्गज अ‍ॅथलेटिकपटू उत्तेजक सेवन करीत असल्याचा आरोप वाडाच्या स्वतंत्र शिष्टमंडळाने सादर केलेल्या अहवालात केला होता. रशियातील उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने नियमितपणे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. वाडाच्या या शिफारशीनंतर आंतरराष्ट्रीय संघटना अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) गेल्या आठवडय़ात रशियावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला.