जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीची (वाडा) बुधवारी कोलोरॅडो येथे बैठक होणार असून त्यामध्ये उत्तेजक सेवनाला पाठिशी घालणाऱ्या रशियाविरुद्ध कडक कारवाई करण्याचा विषय केंद्रस्थानी असणार आहे.

वाडा संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) रशियावर तात्पुरती बंदी घातली असून रशियातील उत्तेजक प्रतिबंधकासाठी काय काय व्यवस्था करण्यात आल्या आहेत, हे पाहण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्ती केली आहे. उत्तेजक सेवन करणाऱ्यांना रशियाकडून पाठिशी घातले जाते, तसेच त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर लाच घेतली जाते, अशी टिपणी वाडा संस्थेच्या अहवालात म्हटले होते. त्याच्या आधारे आयएएएफने रशियन धावपटूंवर कारवाई केल्यामुळे अनेक खेळाडूंना पुढील वर्षी रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून वंचित राहावे लागणार आहे.
वाडा संस्थेने उत्तेजक प्रतिबंधकाबाबत अनेक नियम केले आहेत. या नियमांचे रशियाकडून योग्य रीतीने पालन होत नाही. त्याबाबतही वाडा संस्थेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
वाडा संस्थेचे अध्यक्ष क्रेग रिडी यांनी सांगितले, केवळ रशिया नव्हे तर अन्य अनेक देशांमध्येही उत्तेजक सेवनाला पाठिशी घातले जात आहे. त्यामुळेच याबाबत काही गंभीर पावले उचलली जाणार आहेत.

रशियावरील कारवाई अयोग्य – इसिनबायेव्हा
आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) घातलेल्या बंदीविरोधात रशियाचे दिग्गज अ‍ॅथलेटिकपटू एकवटले आहेत. हा निर्णय पूर्णपणे अयोग्य असल्याचा दावा पोल वॉल्टपटू येलेना इसिनबायेव्हाने केला आहे. ‘‘बेजबाबदार अ‍ॅथलेटिकपटूंच्या चुकीची शिक्षा माझ्यासारख्या खेळाडूंनी का भोगावी,’’ असा सवाल तीन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या इसिनबायेव्हाने केला आहे. ३३ वर्षीय इसिनबायेव्हा रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास उत्सुक आहे आणि कारकीर्दीतील तिची ही पाचवी व अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा आहे.