खेळांचा उद्देश मनोरंजन आणि करमणुकीपुरता राहिलेला नाही. जेतेपदे, यश यासाठी टोकाची व्यावसायिक चुरस अनुभवायला मिळते. कामगिरी सदोदित चांगली होणे, कायम आरोग्य व्यवस्थित असणे या गोष्टी दिवास्वप्नांसारख्या आहेत. सतत जिंकण्याच्या, पुढे राहण्याच्या ईष्र्येतून उत्तेजकांच्या वापराला चालना मिळते. स्वकर्तृत्वाच्या बळावर विजेता व्हावा, हे खेळभावनेचे प्रमाण; परंतु गेल्या दशकभरात या मूलभूत संकल्पनेलाच हरताळ फासला जात आहे.

मारिया शारापोव्हाच्या निमित्ताने मेलडोनियम हे उत्तेजक द्रव्य प्रसिद्धीझोतात आले. प्रदर्शन उंचावण्यासाठी क्रीडापटूंची ही

नवी कृत्रिम सबब. मेलडोनियमच्या गर्तेत सापडलेले दोषी क्रीडापटू जगासमोर येत असतानाच ‘वाडा’ अर्थात जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संघटनेने घूमजाव केले. मेलडोनियमसंदर्भात ठोस, सखोल आणि सर्वसमावेशक माहिती नसल्याचे ‘वाडा’ने स्पष्ट केले. या निर्णयामुळे असंख्य क्रीडापटूंच्या डोक्यावरची बंदीची तलवार हटणार आहे. मात्र त्याच वेळी मेलडोनियमचा वापर प्रदर्शन सुधारण्यासाठी करणारे दोषी खेळाडू बंदीच्या कचाटय़ातून अलगदपणे बाहेर पडण्याची शक्यता आहे. क्रीडाविश्वाला उत्तेजकांचे ग्रहण असताना संशोधन पूर्ततेपूर्वीच मेलडोनियमवर बंदी घालण्याचा ‘वाडा’चा निर्णयही ढिसाळ धोरणाचे प्रतीक आहे.

 

मेलडोनियम काय आहे?

मेलडोनियमचे शास्त्रीय नाव मिलड्रोनेट असे आहे. ग्रिंडेक्स ही लॅटव्हियाची फार्मास्युटिकल कंपनी या औषधाची निर्मिती करते. या औषधातील मेलडोनियम हे द्रव्यघटक आहे. पेशींच्या रक्तपुरवठय़ात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि ऑक्सिजन तसेच ग्लुकोजचे प्रमाण कमी करणाऱ्या इशकिमिया आजारावर उपचार म्हणून मेलडोनियम देण्यात येते. शारापोव्हाच्या म्हणण्यानुसार नियमित वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गेली दहा वर्षे ती मेलडोनियमचे सेवन करत आहे. युरोप आणि रशियात सहजपणे मेलडोनियम उपलब्ध असते. मात्र अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मेलडोनियमच्या वापराला संमती नाही. मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना शारीरिक ताकद वाढण्यासाठी तसेच मानसिक कणखरतेसाठीही मेलडोनियम दिले जाते. सुदृढ व्यक्तींनाही औषधाचे समान परिणाम जाणवतात.

 

‘वाडा’तर्फे बंदी का?

शरीरातले ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यात आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी उपयुक्त असल्याने असंख्य क्रीडापटू मेलडोनियमचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. ‘वाडा’ सातत्याने अशा द्रव्यांचा आढावा घेत असते. मेलडोनियम वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यावर ‘वाडा’ने त्यावर बंदी घालण्याचे निश्चित केले. १६ सप्टेंबर २०१५ पासून मेलडोनियम प्रतिबंधित उत्तेजकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आणि १ जानेवारी २०१६ पासून मेलडोनियम सेवनात दोषी आढळण्यात आलेल्या क्रीडापटूंवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. शरीरातील मध्यवर्ती मज्जासंस्थेचे कामकाज जलदगतीने होण्यास उद्युक्त करणारे उत्तेजक असा ठपका मेलडोनियमवर ठेवण्यात आला.

 

शारापोव्हा केव्हा दोषी आढळली?

वर्षांतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत २६ जानेवारीला सेरेना विल्यम्सने मारिया शारापोव्हाला नमवले. याच दिवशी शारापोव्हाची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. ‘वाडा’च्या अहवालानुसार मेलडोनियमच्या सेवनप्रकरणी शारापोव्हा दोषी आढळली. २ मार्च रोजी शारापोव्हावर आरोप निश्चित करण्यात आले. नियमावलीत नव्याने समाविष्ट झालेल्या प्रतिबंधित उत्तेजकांसंदर्भात ‘वाडा’ने २२ डिसेंबरला सर्व खेळाडूंना ई-मेल पाठवला होता. तो मिळाल्याचे शारापोव्हाने मान्य केले, मात्र उत्तेजकांच्या सविस्तर यादीच्या लिंकवर क्लिक केले नसल्याची कबुली शारापोव्हाने दिली.

 

शारापोव्हाचा युक्तिवाद

‘‘मी सातत्याने आजारी पडत होते. डॉक्टरांनी शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असल्याचे सांगितले. इलेक्ट्रोकार्डिओग्रॅमचे अनियमित अहवाल येत होते. माझ्या घरी मधुमेह आनुवंशिक आहे. माझ्या शरीरातही मधुमेहाची सूक्ष्म लक्षणे दिसत होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० वर्षे मेलडोनियम घेत होते. इतकी वष्रे ‘वाडा’च्या प्रतिबंधित उत्तेजकांच्या यादीत मेलडोनियमचा समावेश नव्हता. १ जानेवारीपासून मेलडोनियमवर प्रतिबंध घालण्यात आला, मात्र मला याची कल्पना नव्हती.’’

 

ग्रिंडेक्स कंपनीचा खुलासा  

मेलडोनियमवर बंदी घालण्यापूर्वी ‘वाडा’ने तीन महिने आधी संकेतस्थळावर या संदर्भात सविस्तर माहिती जाहीर केली होती. रशियाच्या उत्तेजकविरोधी संघटनेनेही याची दखल घेत घोषणा केली होती. ई-मेलमधील लिंकवर क्लिक न केल्याचा दावा शारापोव्हाने केला. मात्र मेलडोनियमची निर्मिती करणाऱ्या ग्रिंडेक्स कंपनीने केलेल्या खुलाशामुळे शारापोव्हाचे नियमबाहय़ वर्तन उघड झाले. कोणत्याही आजारावर उपचार म्हणून मेलडोनियमचे सेवन ४ ते ६ आठवडय़ांपुरतेच मर्यादित असावे.

१० वर्षे सलग मेलडोनियमचे सेवन करणे अपेक्षितच नाही, असे ग्रिंडेक्स कंपनीने स्पष्ट केले. आजाराची तीव्रता वाढल्यास दोन ते तीन वर्षांनी औषध पुन्हा ४ ते ६ आठवडय़ांपुरते घेता येऊ शकते. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला प्रमाण मानावा, असेही कंपनीने सांगितले. सुदृढ व्यक्तींची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी तसेच दुखापतीतून सावरताना तंदुरुस्त होण्यासाठी उपयोगी. क्रीडापटूंना स्पर्धात्मक वापरासाठी मेलडोनियम उपयुक्त ठरत नाही. काही वेळेला उलटा परिणामही होऊ शकतो. हृदयाचे कामकाज ठप्प होण्यापासून तसेच स्नायूंवर पडलेला ताण कमी करण्यासाठी मेलडोनियमचा वापर होऊ शकतो, असे कंपनीने स्पष्ट केले.

 

‘वाडा’चे घूमजाव का?

मेलडोनियम नेमके किती काळ शरीरात राहते आणि किती कालावधीनंतर त्याचे शरीरातून उत्सर्जन होते, याविषयी निश्चित माहिती नसल्याने ‘वाडा’ने निर्णयात बदल केला. मेलडोनियमचा प्रतिबंधित उत्तेजकांच्या यादीत समावेश होण्यापूर्वी खेळाडूंनी त्याचे सेवन केलेले असेल. मात्र बंदीची शिक्षा लागू झाल्यानंतर शरीरात मेलडोनियम आढळले, तर तांत्रिकदृष्टय़ा खेळाडूंना दोषी ठरवता येणार नसल्याने ‘वाडा’ने भूमिका बदलली.

मेलडोनियम सेवनप्रकरणी दोषी खेळाडूंना पूर्ण अभय देण्यात येणार नाही. तसेच शरीरातील मेलडोनियमच्या अस्तित्वाबद्दल त्यांना सत्य माहिती द्यावी लागेल, असे ‘वाडा’ने जाहीर केले आहे. जागतिक स्तरावरील अव्वल टेनिसपटू शारापोव्हा दोषी आढळल्यानंतर बहुतांशी प्रायोजकांनी तिच्याबरोबरचे जाहिरातींचे करार मोड१त काढले.

पूर्वीच्या नियमानुसार शारापोव्हावर प्रदीर्घ बंदीला सामोरे जावे लागले असते. मात्र आता ‘वाडा’च्या निर्णयामुळे शारापोव्हासह असंख्य खेळाडूंच्या कारकीर्दीला नवसंजीवनी प्राप्त होईल. मात्र त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झालेले नाही. त्याच वेळी दोषी खेळाडू मोकाट होण्याची भीती आहे. आजीवन बंदीसारख्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या मेलडोनियमचा सर्वागीण अभ्यास न करता प्रतिबंधित यादीत केलेला समावेश रशियाविरोधी धोरण दर्शवते. रशियाचे क्रीडापटू उत्तेजकांच्या गर्तेत सापडत आहेत. ही यादी वाढावी अशी रशियाच्या शत्रूंची सुप्त इच्छा आहे. खेळाच्या माध्यमातून हितसंबंधांची फटकेबाजी ‘वाडा’च्या निर्णयाने रोखली गेली आहे.

– पराग फाटक
parag.phatak@expressindia.com