इंग्लंडविरुद्ध भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदावर जोरदार टीका होत आहे. परदेशात आणखी एका कसोटी मालिका गमावल्यानंतर आता तू कर्णधारपद सोडशील का? या प्रश्नाला खुलेपणाने उत्तर दिले. ‘‘या पराभवातून खचून न जाता समर्थपणे वाटचाल करण्यासाठी मी सक्षम आहे की नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला ‘थांबा आणि वाट पाहा’ ही भूमिका घ्यायला हवी,’’ असे धोनी म्हणाला. त्यानंतर, भारताचा कसोटी कर्णधारपदाला तू पुरेसा न्याय दिला आहेस का? या आणखी एका बाऊन्सरलाही धोनीने शांतचित्ताने ‘कदाचित, होय’ असे उत्तर देऊन परतवून लावले.
भारतीय संघ शेवटच्या तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांमध्ये अपयशी ठरले. याबाबत धोनी म्हणाला, ‘‘मुरली विजयने आपली भूमिका चोख बजावली. परंतु पहिल्या कसोटी सामन्यापासून आम्हाला चांगली सलामीची भागीदारी मिळाली नाही. याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावरील चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावरील विराट कोहली मैदानावर टिकाव धरू शकले नाहीत.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘अखेरच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये आमच्याकडून प्रतिकार झाला नाही. त्यामुळे मी अतिशय निराश झालो आहे. या पराभवातून धडा घेऊन खेळाडू सकारात्मक पद्धतीने भविष्यात वाटचाल करतील, अशी मी आशा बाळगतो. संघातील बरेचसे खेळाडू युवा आणि गुणवान आहेत. त्यामुळे ते येथे परततील आणि यश मिळवतील.’’

भारतीय संघाला आर्थिक दंड
दुबई : ओव्हवरील पाचव्या कसोटीतील पराभवामुळे मालिका गमावण्याची नामुष्की ओढवलेल्या भारतीय संघाला आता आर्थिक दंडाच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागणार आहे. या कसोटीत षटकांची गती धिमी राखल्यामुळे धोनीच्या सामन्याच्या मानधनापैकी ६० टक्के तर संघातील अन्य खेळाडूंच्या मानधनाचे ३० टक्के आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. वेळेच्या नियोजनानुसार भारतीय संघाने तीन षटके कमी टाकली. याचा ठपका ठेवत आयसीसीचे सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी हा दंड ठोठावला आहे. आता पुढील १२ महिन्यांच्या कालावधीत धोनीने षटकांच्या गतीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आयसीसीच्या नियमानुसार एका सामन्याची बंदी घालण्यात येईल.