आशियाई बॅडमिंटन स्पर्धा

लागोपाठ तीन स्पर्धामध्ये खेळल्यावर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आता ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल आता पुढील मोसमासाठी सज्ज झाल्या आहेत. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार असून गेल्या ५४ वर्षांत भारताला या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालता आलेली नाही. त्यामुळे सिंधू, सायना हा विजेतेपदाचा दुष्काळ संपवतील, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

दिनेश खन्ना यांनी १९६५ मध्ये भारताला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवून दिले होते. गेल्या वर्षी सायना आणि एच. एस. प्रणॉय यांनी कांस्यपदकाची कमाई केली होती. सायनाने २०१० आणि २०१६ मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे, तर सिंधूने २०१४च्या स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली होती.

अकाने यामागुची, चेन युफेई, रत्चानोक इन्थनोन त्याचबरोबर गतविजेती ताय झू यिंग या अव्वल खेळाडूंनी आशियाई स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधू, सायनासमोरील प्रमुख अडथळे आधीच दूर झाले आहेत. सिंधूने सिंगापूर खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारली होती. तिला पहिल्या फेरीत जपानच्या सायाका ताकाहाशी हिच्याशी लढत द्यावी लागेल. या सामन्यात विजय मिळवल्यास तिच्यासमोर पोर्नपावी चोचुवाँग हिचे आव्हान असेल. सिंधूला पुढे कोरियाच्या संग जी ह्य़ून हिचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

या वर्षी भारताकडून एकमेव विजेतेपद मिळवणाऱ्या सायनाला दुखापतीमुळे दोन स्पर्धाना मुकावे लागले होते. मलेशिया येथील स्पर्धेत सायनाने पुनरागमन केले होते. सातव्या मानांकित सायनाचा सलामीचा सामना चीनच्या हान यूए हिच्याशी होणार आहे.

पुरुष एकेरीत, किदम्बी श्रीकांतला इंडोनेशियाच्या शेसार हिरेन हुस्ताविटो याच्याशी दोन हात करावे लागतील. पुढील फेरीत त्याला टिएन मिन्ह गुयेन याचा, तर उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. समीर वर्माची सलामीची लढत जपानच्या काझुमासा साकाय याच्याशी होईल.

पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज-संयाम शुक्ला, एमआर अर्जुन-रामचंद्रन श्लोक आणि मनू अत्री-बी. सुमित रेड्डी या तीन जोडय़ा आपले नशीब अजमावतील. महिला दुहेरीत पूजा दांडू-संजना संतोष, अपर्णा बालन-श्रुती केपी, मेघना जाक्कामपुडी-पूर्विशा राम या तीन जोडय़ा भारताकडून सहभागी होतील.